
बर्मिंगहॅम : युवा कर्णधार शुभमन गिल भारतासाठी रनमशीन ठरला असून शनिवारी त्याने आणखी एकदा शतकी (१६१ धावा) बॅट उंचावत मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर शनिवारी भारताला मजबूत स्थितीत आणले. चौथ्या डावातील त्याचे हे तिसरे शतक ठरले. ५ सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीपर्यंत गिलने तीन शतकांसह ५०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान ४२७ धावा करून भारताने डाव घोषित केला आणि इंग्लंडसमोर विजयासाठी ६०८ धावांचे आव्हान दिले. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा पहिल्या डावातील आघाडीसह भारताकडे ५३६ धावांची आघाडी होती. इंग्लंडने ७२ धावांवर ३ फलंदाज गमावले होते.
ऋषभ पंतने फटकेबाजी करत भारताची धावसंख्या पुढे नेली. त्याने ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५८ चेंडूंत ६५ धावांची वेगवान खेळी खेळली. पंत आणि गिल या जोडीने चौथ्या विकेटसाठी ११० धावांची भागिदारी केली. लंचनंतर गिलने धावांची गती वाढवली. त्याने चहापानापूर्वी आपले सलग दुसरे शतक साजरे केले. या सत्रात भारताने ३० षटकांत १२७ धावा जमवल्या.
चहापानाच्या आधी बशीरच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत गिलने मैलाचा दगड पार केला. त्यावेळी दुसऱ्या डावात भारताची धावसंख्या ३०४ धावांवर पोहोचली. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने द्विशतक झळकावले. तर दुसऱ्या डावात शतक झळकावत त्याने भारताला मजबूत स्थितीत आणले.
सकाळच्या सत्रात इंग्लिश गोलंदाजांनी गिलवर आक्रमण केले. मात्र दुसऱ्या सत्रात गिलने यजमानांच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला.
पहिल्या सत्रात जोश टंगने दोन वेळा शॉर्ट बॉलचा प्रयोग केला. गिलने फाईन लेगला पुल करत हे दोन्ही चेंडू सीमारेषेबाहेर पाठवले. पहिल्या सत्रात केएल राहुलने (८४ चेंडूंत ५५ धावा) काही सुंदर कव्हर ड्राईव्ह्ज मारले. पण टंगने टाकलेल्या एका अप्रतिम चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. भारताने १७७धावांवर तीन गडी गमावले होते. त्यावेळी पंतने आपल्या खास शैलीत फलंदाजी करून सत्रात रंगत आणली.
करुण नायर (४६ चेंडूंत २६ धावा) हा दिवसातील पहिला बाद झालेला फलंदाज ठरला. कार्सच्या सापळ्यात तो अडकला. ड्राईव्ह करताना चेंडूने त्याच्या बॅटची कड घेतली आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती जाऊन विसावला.
रवींद्र जडेजानेही गिलला छान साथ दिली. या दरम्यान जडेजाने आपले अर्धशतक साजरे केले. भारताने दुसऱ्या डावात ६ फलंदाज गमावून ४२७ धावांवर डाव घोषित केला. जडेजाने नाबाद ६९ धावा केल्या. तर पंतने ६५ धावांची खेळी खेळली. इंग्लंडच्या जोश टंग आणि शोएब बशीर यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवल्या. तर कार्स आणि जो रुट यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडले.
रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांनी शुभमन गिलला छान साथ दिली. या दोघांनीही आपले वैयक्तिक अर्धशतक झळकावत भारताच्या धावसंख्येला वेग दिला. पंतने आपल्या ६५ धावांच्या खेळीत ८ चौकार आणि ३ षटकार लगावले. ६५ धावा जमवताना त्याने केवळ ५८ धावांचा सामना केला. यावरूनच त्याच्या वेगवान खेळाची अंदाज येतो. दुसरीकडे पंत बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजाने गिलच्या साथीने भारताची धावसंख्या पुढे नेली. जडेजाने संथ फलंदाजी केली. या दरम्यान त्याने आपले अर्धशतकही साजरे केले. जडेजाने ११८ चेंडूंत ५ चौकार आणि एक षटकार लगावत नाबाद ६९ धावा केल्या.
त्याआधी सलामीवीर केएल राहुलने आपले अर्धशतक साजरे केले. त्याने ८४ चेंडूंत ५५ धावांची खेळी खेळली. राहुलने आपली ही खेळी १० चौकारांनी सजवली. गिल वगळता या डावात भारतीय संघाच्या ३ फलंदाजांनी अर्धशतक झळकावले. भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात या तिकडीने हातभार लावला.
शतकी खेळीसह गिलने भारताचे माजी दिग्गज ३४४ खेळाडू सुनील गावस्कर यांच्या विक्रमाला मागे टाकले. वेस्ट इंडिजविरुद्ध १९७१ मध्ये गावस्कर यांनी एका कसोटीत ३४४ धावा केल्या होत्या. एका कसोटीतील भारतीय खेळाडूची ही सर्वाधिक धावसंख्या होती.
चौथ्या डावातील त्याचे हे तिसरे शतक ठरले. ५ सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीपर्यंत गिलने ३ शतकांसह ५०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.