IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल बनला द्विशतकी विक्रमादित्य! अनेक विक्रमांना गवसणी; कोहली, सचिनचा रेकॉर्डही मोडला

रोहित शर्माकडून कसोटी कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शुभमन गिलची कारकीर्द ‘सातवे आसमाँ पर’ आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत गुरुवारी द्विशतकाला गवसणी घालणाऱ्या शुभमन गिलने अनेक विक्रमांची नोंद केली.
IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल बनला द्विशतकी विक्रमादित्य! अनेक विक्रमांना गवसणी; कोहली, सचिनचा रेकॉर्डही मोडला
Published on

बर्मिंगहॅम : रोहित शर्माकडून कसोटी कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शुभमन गिलची कारकीर्द ‘सातवे आसमाँ पर’ आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत गुरुवारी द्विशतकाला गवसणी घालणाऱ्या शुभमन गिलने अनेक विक्रमांची नोंद केली. कसोटीत सर्वाधिक धावा करणारा पहिला भारतीय आणि आशियाई कर्णधार तसेच आशिया खंडाबाहेर सर्वाधिक धावा फटकावणारा पहिला भारतीय फलंदाज असा मान पटकावणाऱ्या ‘किंग गिल’ने आता विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांचाही विक्रम मागे टाकला.

इंग्लिश भूमीत सुनील गावस्कर यांनी १९७९मध्ये ओव्हल कसोटीत २२१ धावांची खेळी साकारली होती. त्यांचा हा विक्रम मागे टाकत शुभमनने ३८७ चेंडूंत ३० चौकार आणि ३ षटकारांसह २६९ धावांची तडाखेबंद खेळी केली. गिलने विराट कोहली (नाबाद २५४) आणि सचिन तेंडुलकर (नाबाद २४८) यांचा कसोटीतील सर्वाधिक धावांचा विक्रम देखील मागे टाकला.

आशिया खंडातील पहिला कसोटी कर्णधार

लीड्स येथील पहिल्या कसोटीत १४७ धावा केल्यानंतर बर्मिंगहॅम कसोटीत द्विशतक झळकावत गिलने कर्णधारपदाच्या लौकिकाला साजेशी खेळी साकारली. कर्णधार म्हणून आपल्या तिसऱ्याच कसोटीत द्विशतक झळकावण्याची किमया गिलने गुरुवारी साधली. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या ‘सेना’ देशांमध्ये द्विशतक साजरे करणारा गिल हा आशिया खंडातील पहिला कसोटी कर्णधार ठरला. याआधी तिलकरत्ने दिलशानने २०११मध्ये लॉर्ड्स कसोटीत सर्वाधिक १९३ धावा फटकावल्या होत्या. २५ वर्षे आणि २९८ दिवस वय असलेला गिल हा कसोटीत द्विशतक झळकावणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात युवा भारतीय कर्णधार ठरला आहे. हा विक्रम मन्सूर अली खान पतौडी (२३ वर्षे ३९ दिवस) यांच्या नावावर आहे.

गिलच्या विक्रमांवर एक नजर

-गिल हा इंग्लंडमध्ये कसोटीत द्विशतक झळकावणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला.

-गिल हा सेना कंट्रीज म्हणजेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या चारपैकी एका देशात द्विशतक झळकावणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला. किंबहुना आशिया खंडातील एखाद्या कर्णधारालाही अशी कामगिरी जमलेली नाही. मोहम्मह अझरुद्दीन यांनी १९९०मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १९० धावा केल्या होत्या. मात्र द्विशतक आजवर कोणीच झळकावलेले नव्हते.

-कर्णधार म्हणून कारकीर्दीतील दुसऱ्याच कसोटीत द्विशतक झळकावणारा गिल हा भारताचा दुसरा फलंदाज ठरला. सुनील गावस्कर यांनीसुद्धा कर्णधार म्हणून दुसऱ्या कसोटीत (१९७८ वि. वेस्ट इंडिज) द्विशतक साकारले होते.

-गिलने सुनील गावस्कर यांचा भारतीय फलंदाजातर्फे इंग्लंडमध्ये एखाद्या कसोटी सामन्यात रचण्यात आलेला सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला. गावस्कर यांनी १९७९मध्ये २२१ धावांची खेळी साकारली होती. गिलने २६९ धावा केल्या.

-गिलने विराट कोहलीचा विक्रमही मोडीत काढला. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून सर्वोच्च धावसंख्या विराटच्या नावावर होती. विराटने आफ्रिकेविरुद्ध २५४ धावा केल्या होत्या. गिलने त्याच्यापेक्षा १५ धावा अधिक गेल्या.

logo
marathi.freepressjournal.in