ICC World Cup 2027 : खेळाडूंच्या दुखापती, व्यस्त वेळापत्रकामुळे सर्वोत्तम संघ निवडणे कठीण - गिल

दुखापती आणि व्यस्त वेळापत्रकामुळे संघात सातत्य राखणे कठीण झाले असून, आगामी २०२७ च्या आयसीसी विश्वचषकासाठी संभाव्य खेळाडूंना आतापासूनच नियमित संधी द्यायची आहे, असे भारताचा कर्णधार शुभमन गिलने व्यक्त केले.
ICC World Cup 2027 : खेळाडूंच्या दुखापती, व्यस्त वेळापत्रकामुळे सर्वोत्तम संघ निवडणे कठीण - गिल
ICC World Cup 2027 : खेळाडूंच्या दुखापती, व्यस्त वेळापत्रकामुळे सर्वोत्तम संघ निवडणे कठीण - गिल
Published on: 

मुल्लानपूर : दुखापती आणि व्यस्त वेळापत्रकामुळे संघात सातत्य राखणे कठीण झाले असून, आगामी २०२७ च्या आयसीसी विश्वचषकासाठी संभाव्य खेळाडूंना आतापासूनच नियमित संधी द्यायची आहे, असे भारताचा कर्णधार शुभमन गिलने व्यक्त केले.

वेस्ट इंडिजविरुद्ध नुकताच संपलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला असला, तरी जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल हे खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत व्यस्त असल्यामुळे भारताची गोलंदाजी काहीशी कमकुवत ठरली होती. त्यातच दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा देखील दुखापतीमुळे बाहेर झाला. शनिवारी झालेल्या तिसऱ्या लढतीत भारताला ३५१ धावांचा बचाव करण्यात अपयश आले. शाय होपच्या दीडशतकामुळे वेस्ट इंडिजने भारतावर ५ गडी राखून मात केली. आता ६ ऑक्टोबरपासून उभय संघांत ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू होईल.

“प्रयोग करण्यासाठी आता फारसा वेळ उरलेला नाही आणि विश्वचषकासाठी आपल्याला ज्या खेळाडूंच्या संयोजनासह खेळायचे आहे, तीच अंतिम फळी आतापासूनच मैदानात उतरवणे गरजेचे आहे. आघाडीचे गोलंदाज वारंवार उपलब्ध नसणे आणि इतर सामने जवळ असणे दुर्दैवी आहे. त्यामुळे हव्या त्या गोलंदाजी आक्रमणासह मैदानात उतरता आले नाही. मात्र, या परिस्थितीमुळे नव्या गोलंदाजांना आपले कौशल्य सिद्ध करण्याची चांगली संधी मिळाली,” असे गिल म्हणाला.

तिसऱ्या सामन्यातील पराभवासंदर्भात गिलने पॉवरप्ले आणि डेथ ओव्हरमधील गोलंदाजीच्या अपयशावर बोट ठेवले. “पॉवरप्लेमध्ये सुरुवातीला बळी न मिळाल्यास मधल्या षटकांमध्ये फलंदाजांवर नियंत्रण मिळवणे कठीण होते, ज्यामुळे ही मालिका धावसंख्येच्या दृष्टीने उच्चांकी ठरली,” असे गिलने सांगितले. मालिकेत भारतीय क्षेत्ररक्षकांनी सुमारे सात झेल सोडल्यामुळे संघाची लय बिघडल्याचे गिलने कबूल केले.

पदार्पण करणारे आकिब नबी आणि अंशुल कंबोज यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरावण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, असे सांगत गिलने अष्टपैलू नितीश रेड्डी आणि इतर खेळाडूंबाबत निवडकर्त्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वीच २०२७च्या आयसीसी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २ ऑक्टोबरपासून पुढील वर्षी विश्वचषक सुरू होईल.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in