
दुबई : बर्मिंगहॅम कसोटीत भारताला विजय मिळवून देणारे द्विशतक कायमच स्मरणात राहणार असल्याची भावना भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने व्यक्त केली. मंगळवारी आयसीसीने जुलै महिन्याचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर केला. नुकत्याच झालेल्या इंग्लंडमधील ५ कसोटी सामन्यांत ७५४ धावा जमवणाऱ्या गिलने हा पुरस्कार जिंकला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू वियान मुल्डर यांना मागे टाकत गिलने या पुरस्कारावर नाव कोरले. त्यानंतर त्याने या मालिकेबद्दल आपली भावना व्यक्त केली.
इंग्लंड दौऱ्यातील सर्वात अमूल्य आठवण
जुलै महिन्याचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकल्यामुळे मला फार आनंद झाला आहे. कसोटी कर्णधार म्हणून माझी ही पहिलीच मालिका होती. त्यामुळे या मालिकेत पुरस्कार जिंकल्याचा आनंद माझ्यासाठी वेगळाच आहे. बर्मिंगहॅम कसोटीत झळकावलेले द्विशतक हे माझ्या कायमच लक्षात राहील. इंग्लंड दौऱ्यातील ही सर्वात अमूल्य अशी आठवण आहे, असे गिल म्हणाला. इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्ये कसोटी मालिका कर्णधार म्हणून मला बरेच काही शिकवून गेली. दोन्ही संघांनी चांगला खेळ केला. ही मालिका दोन्ही संघ कायम लक्षात ठेवतील. असे सांगत २५ वर्षीय भारताचा कर्णधार म्हणाला की, आगामी मालिकांमध्येही आपला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेन.
परिक्षक मंडळाचे, सहकाऱ्यांचेही मानले आभार
आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार चार वेळा जिंकणारा गिल हा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. इंग्लंडमधील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील जुलै महिन्यात खेळल्या गेलेल्या तीन कसोटींमध्ये गिलने ९४.५० च्या सरासरीने ५६७ धावा केल्या. याआधी गिलने जानेवारी २०२३, सप्टेंबर २०२३ आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे. माझी निवड केल्याबद्दल मी परिक्षक मंडळाचे आभार मानतो आणि इंग्लंड मालिकेदरम्यान माझ्यासोबत असलेल्या माझ्या सहकाऱ्यांचेही मनापासून आभार मानतो. आगामी हंगामात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल आणि देशाला अधिक सन्मान मिळवून देईन असा विश्वास गिल याने व्यक्त केला.
इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर युवा खेळाडू शुभमन गिलच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. या मालिकेत गिलने फलंदाज आणि नेतृत्व अशा दोन्ही आघाड्यांवर प्रभावी कामगिरी केली. भारताच्या या युवा कर्णधाराने मालिकेत ४ शतके झळकावत ७५४ धावा केल्या.
गोलंदाजांच्या क्रमवारीत दीप्ती शर्मा दुसऱ्या स्थानी
भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने आयसीसी महिला टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. सलामीवीर स्मृती मानधनाच्या स्थानात घसरण झाली असून ती आता फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. दीप्ती पाकिस्तानच्या सादिया इक्बालसोबत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाची सडरलँड ही गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने आयसीसी महिला टी-२० खेळाडूंच्या ताज्या क्रमवारीत १० स्थानांची झेप घेतली असून, ती आता टॉप १० च्या उंबरठ्यावर आहे. सध्या ती ११ व्या स्थानी आहे. दुसरीकडे चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या आयर्लंडच्या अष्टपैलू ऑर्ला प्रेंडरगास्टला पाकिस्तानविरुद्धच्या दमदार कामगिरीचा मोठा फायदा झाला. ती आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च १९व्या क्रमांकावर पोहोचली आहे.
महिलांमध्ये सोफिया डंकली विजेती
इंग्लंडची फलंदाज सोफिया डंकली हिला महिलांमध्ये जुलै महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डंकलीने तिची सहकारी सोफी एक्लेस्टोन आणि आयर्लंडची कर्णधार गेबी लुईस यांना मागे टाकत हा पुरस्कार जिंकला. डंकलीने भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय आणि चार टी-२० सामन्यांमध्ये एकूण २७० धावा केल्या.
रोहितची सरावाला सुरुवात
भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मंगळवारपासून सरावाला सुरुवात केली. माजी राष्ट्रीय सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्यासोबत त्याने सराव केला. दरम्यान रोहित क्रिकेटमधून निवृत्ती घेणार नसल्याचे या सराव सत्रातून दिसून येते. आयपीएलनंतर रोहितने क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो कुटुंबासोबत इंग्लंडला गेला होता. गेल्या आठवड्यात तो तेथून परतला आहे. रोहितने सोशल मीडियावर व्यायामशाळेतील एक व्हिडीओ टाकला आहे. त्यात तो प्रशिक्षक व मित्र अभिषेक नायरसोबत जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे.