
नवी दिल्ली : शुभमन गिलकडे भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय योग्य आहे. मात्र आता या युवा कर्णधाराला त्याचे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने व्यक्त केले. संक्रमणाचा काळ भारतीय संघ इतर संघांच्या तुलनेत उत्तमपणे हाताळेल, असा विश्वास पाँटिंगने व्यक्त केला.
विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवीचंद्रन अश्विन या दिग्गज खेळाडूंनी अलीकडेच कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थित भारतीय संघ इंग्लंडशी दोन हात करणार आहे.
दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व कोणत्या खेळाडूकडे देणार याकडे जगाचे लक्ष लागले होते. अखेर गिलच्या खांद्यावर ही धुरा सोपवण्यात आली. त्याबाबत बोलताना पाँटिंग म्हणाला की, या निर्णयावर अनेकजण विचारत असतील की गिलऐवजी बुमरा का नाही. पण हा निर्णय अपेक्षित होता.
गेल्या काही वर्षांपासून बुमरा हा दुखापतीने त्रस्त आहे. कर्णधार असताना असे वारंवार दुखापतग्रस्त होणे योग्य नाही. कर्णधार वारंवार संघाबाहेर जात असेल तर त्याचा परिणाम संघावर होतो. दरम्यान, एकदा निर्णय घेतला की त्यावर ठाम राहायला हवे आणि शुभमन गिलला दीर्घकाळाची संधी द्यायला हवी, असे पाँटिंग म्हणाला. अनुभवी खेळाडूंची कसोटी संघात जागा घेणे खूप कठीण असते. परंतु भारताकडे तरुण प्रतिभावान खेळाडूंची संख्या मोठी आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भारत ही परिस्थिती उत्तमपणे हाताळू शकतो. मी गेली १० वर्षे आयपीएलमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहे. यशस्वी जैस्वालसारख्या युवा खेळाडूंना संधी मिळाली आणि त्यांनी स्वत:ला सिद्ध केले. कौशल्य असलेल्या खेळाडूंमध्ये सुधारणा करवून घेणे हे भारतासाठी जड नाही. परंतु अनुभवाची कमतरता हे भारतासाठी खरे आव्हान असेल, असे पाँटिंगला वाटते. युवा खेळाडू गिलकडे नेतृत्वाची धुरा सोपवली असली तरी के. एल. राहुल, जसप्रीत बुमरासारखे अनुभवी खेळाडू संघात असतील. त्यामुळे संक्रमणाच्या काळात भारतीय संघ परिस्थिती चांगली हाताळू शकतो, असे पाँटिंग म्हणाला.
अर्शदीपला संधी द्या!
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पंजाब किंग्जला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या संघातील डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला पहिल्या कसोटीत संघात संधी द्यायला हवी, असे पाँटिंगला वाटते. संघात डावखुरा वेगवान गोलंदाज असणे संघासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे अर्शदीप संघात हवाच. त्याच्यात कौशल्य आहे, तो इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळला आहे, असे पाँटिंग म्हणाला.