
भारताचा स्टार सलामीवीर शुभमन गिलने बुधवारी फेब्रुवारी महिन्याचा 'आयसीसी पुरुष प्लेयर ऑफ द मंथ' (ICC Men's Player of the Month award) पुरस्कार पटकावला. हा गिलसाठी तिसरा आयसीसी पुरुष प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार आहे. यापूर्वी त्याने जानेवारी आणि सप्टेंबर २०२३ मध्ये हा किताब पटकावला होता. ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ आणि न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स यांना मागे टाकत गिलने या पुरस्कारावर नाव कोरले.
'अशी' कामगिरी करणारा केवळ दुसरा खेळाडू
तिसऱ्यांदा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकणारा गिल केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमने यापूर्वी अशी कामगिरी केली होती. तर, फक्त सहा खेळाडूंनी हा पुरस्कार दोन वेळा जिंकला आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने हा पुरस्कार दोनदा जिंकला आहे.
स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन फिलिप्सवर मात
शुभमन गिल, स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन फिलिप्स यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांच्या अलिकडच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. स्मिथ आणि फिलिप्स यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रभावी कामगिरी केली असली तरी, संपूर्ण महिनाभर केलेल्या शानदार कामगिरीमुळे गिलने हा पुरस्कार जिंकला.
फेब्रुवारीमध्ये १०१.५० ची सरासरी, ९४.१९ च्या स्ट्राईक रेटने ४०६ धावा
फेब्रुवारी महिन्यात गिलने फलंदाजीत शानदार कामगिरी केली. या महिन्यात खेळल्या गेलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये गिलने १०१.५० च्या सरासरीने आणि ९४.१९ च्या स्ट्राईक रेटने ४०६ धावा जमवल्या. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताने ३-० असे निर्विवाद वर्चस्व मिळवले. मालिकेत गिलने ३ अर्धशतके झळकावली. नागपूरमधील सामन्यात गिलने ८७ धावा चोपल्या. त्यानंतर कटक येथे ६० धावांची खेळी खेळली. अहमदाबादमध्ये त्याने शतकी खेळी खेळत भारताला विजय मिळवून दिला. ११२ धावांच्या या खेळीत त्याने १४ चौकार आणि ३ षटकार लगावले. या कामगिरीमुळे गिलला मालिकावीर पारितोषिकाने गौरविण्यात आले. याशिवाय, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बांगलादेश विरुद्धच्या सलामीच्या लढतीत गिलने नाबाद शतक झळकावले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्याने ४६ धावा करून संघाच्या विजयात हातभार लावला होता.