IND vs NZ : गिलचे पुनरागमन निश्चित; राहुल किंवा सर्फराझला डच्चू! दुसऱ्या कसोटीपूर्वी भारताच्या सहाय्यक प्रशिक्षकाचे संकेत

भारत-न्यूझीलंड यांच्यातील ३ लढतींच्या मालिकेत किवी संघांने पहिली कसोटी जिंकून १-० अशी आघाडी घेतली आहे.
IND vs NZ : गिलचे पुनरागमन निश्चित; राहुल किंवा सर्फराझला डच्चू! दुसऱ्या कसोटीपूर्वी भारताच्या सहाय्यक प्रशिक्षकाचे संकेत
Published on

पुणे : न्यूझीलंडविरुद्ध पुणे येथे गुरुवार, २४ ऑक्टोबरपासून रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी युवा फलंदाज शुभमन गिल तंदुरुस्त असून त्याचे भारतीय संघातील पुनरागमन पक्के आहे. त्यामुळे सर्फराझ खान किंवा के. एल. राहुलपैकी एकाला वगळण्यात येईल, असे संकेत भारताचा सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डस्काटेने दिले.

भारत-न्यूझीलंड यांच्यातील ३ लढतींच्या मालिकेत किवी संघांने पहिली कसोटी जिंकून १-० अशी आघाडी घेतली आहे. मानेच्या दुखापतीमुळे गिल त्या कसोटीत खेळू शकला नाही. त्याच्या जागी संधी मिळालेल्या सर्फराझने दुसऱ्या डावात दीडशतकी खेळी साकारली. तर राहुलने दोन्ही डावांत अनुक्रमे ० व १२ धावांवर बाद झाला. ऋषभ पंतही या लढतीसाठी तंदुरुस्त असल्याचे समजते. त्यामुळे यष्टिरक्षक म्हणूनही राहुलला संघात स्थान मिळणे कठीण दिसते. अशा स्थितीत सर्फराझला प्राधान्य दिले जाऊ शकते.

“गिल दुसऱ्या कसोटीसाठी तंदुरुस्त आहे. तो त्याच्या नेहमीच्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. त्यामुळे यात लपवण्यासारखे काहीच नाही, की सर्फराझ किंवा राहुल यांच्यापैकी एकाला संघातील स्थान गमवावे लागेल. खेळपट्टी पाहून अंतिम ११ खेळाडूंविषयी निर्णय घेतला जाईल,” असे डस्काटे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाले.

फिरकीपटूंसाठी लाभदायी खेळपट्टी

पहिल्या कसोटीत वेगवान गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर भारताची भंबेरी उडाली. त्यानंतर आता दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ फिरकीपटूंना पोषक खेळपट्टी तयार करत असल्याचे समजते. तसे निर्देश खेळपट्टी विशेषज्ञाला देण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीय संघ पुन्हा रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव व रवींद्र जडेजा यांच्यासह मैदानात उतरू शकतो. तसेच वॉशिंग्टन सुंदरलाही चमूत सहभागी केल्याने, त्याला संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

विल्यम्सन दुसऱ्या कसोटीलाही मुकणार

न्यूझीलंडचा तारांकित फलंदाज व माजी कर्णधार केन विल्यम्सन स्नायूंच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यालाही मुकणार आहे. दुखापतीमुळेच विल्यम्स सध्या न्यूझीलंडमध्येच असून त्याला पहिल्या लढतीतही खेळता आले नाही. मुंबईत १ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी किमान विल्यम्सन परतेल, अशी आशा आहे.

logo
marathi.freepressjournal.in