
अहमदाबाद : उपकर्णधार शुभमन गिलने (१०२ चेंडूंत ११२ धावा) बुधवारी त्याच्या आवडत्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पुन्हा एकदा धडाकेबाज शतक साकारले. गिलच्या शतकाला मुंबईकर श्रेयस अय्यर (६४ चेंडूंत ७८ धावा) आणि अनुभवी विराट कोहली (५५ चेंडूंत ५२ धावा) यांच्या अर्धशतकांची उत्तम साथ लाभली. त्यानंतर गोलंदाजांनाही सांघिक कामगिरीचे प्रदर्शन केले. त्यामुळे भारतीय संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडची १४२ धावांनी धूळधाण उडवताना मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.
उभय संघांतील या मालिकेकडे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पूर्वपरीक्षा म्हणनू पाहिले जात होते. मात्र भारतीय संघाने पहिल्या दोन्ही लढती जिंकून आधीच विजयी आघाडी घेतली होती. त्यानंतर बुधवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडकडून कडवी झुंज अपेक्षित होती. मात्र भारताने दिलेल्या ३५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३४.२ षटकांत २१४ धावांत गारद झाला. गस ॲटकिन्सन आणि टॉम बॅन्टन यांनी प्रत्येकी ३८ धावांचे योगदान दिले. मात्र भारताच्या फिरकी तसेच वेगवान त्रिकुटापुढे इंग्लंडचे अन्य फलंदाज ढेपाळले. शतकवीर गिलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच मालिकेत गिलनेच (८७, ६०, ११२) सर्वाधिक २५९ धावा केल्यामुळे त्याला मालिकावीर पुरस्कारही देण्यात आला. आता सर्वांचे लक्ष १९ फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर आहे.
अहमदाबादला झालेल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारताने या लढतीसाठी संघात तीन बदल करताना मोहम्मद शमीच्या जागी अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजाच्या जागी वॉशिंग्टन सुंदर, तर वरुण चक्रवर्तीच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली. त्यातही वरुणला दुखापतीमुळे या लढतीसाठी अनुपलब्ध असल्याचे समजले. इंग्लंडने ओव्हर्टनच्या जागी बॅन्टनला संघात स्थान दिले.
दरम्यान, भारताची सुरुवात खराब झाली. गेल्या सामन्यातील शतकवीर रोहित दुसऱ्याच षटकात १ धावेवर बाद झाला. त्यानंतर मात्र २५ वर्षीय गिल आणि विराट यांची जोडी जमली. या दोघांनी आक्रमक फलंदाजी करतानाच संघाला १७ षटकांत शतकापलीकडे नेले. विराटने नोव्हेंबर २०२३नंतर प्रथमच एकदिवसीय प्रकारात अर्धशतक झळकावले. त्याने ७ चौकार व १ षटकारासह ५५ चेंडूंत ५२ धावा करतानाच गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी रचली. विराटचे हे एकंदर ७३वे एकदिवसीय अर्धशतक ठरले. फिरकीपटू आदिल रशिदने पुन्हा एकदा विराटला जाळ्यात अडकवून ही जोडी फोडली.
चौथ्या क्रमांकावरील श्रेयसने मग कामगिरीत सातत्य राखताना गिलला योग्य साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची भर घातली. श्रेयसने ८ चौकार व २ षटकारांसह २०वे अर्धशतक साकारले. दुसऱ्या बाजूने गिलने कारकीर्दीतील सातवे शतक साकारताना १४ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी केली. रशिदनेच प्रथम गिल, नंतर श्रेयसला बाद करून भारताच्या धावसंख्येवर अंकुश लगावला. ४ बाद २५९ वरून के. एल. राहुल (४०), हार्दिक पंड्या (१७), अक्षर पटेल (१७) यांनी फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. त्यामुळे भारताचा संघ ५० षटकांत २५६ धावांत गारद झाला. इंग्लंडसाठी रशिदने चार बळी मिळवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना बेन डकेट व फिल सॉल्ट या जोडीने पुन्हा एकदा धडाकेबाज सुरुवात केली. ३८ चेंडूंतच ६० धावा फलकावर लावल्यानंतर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीपने भारताला दुहेरी यश मिळवून दिले. त्याने प्रथम डकेटला (३४), तर दोन षटकांच्या अंतरात सॉल्टला (२३) बाद केले. तिसऱ्या क्रमांकावरील बॅन्टनने ३८, जो रूटने २४, तर हॅरी ब्रूकने १९ धावा केल्या. मात्र यांच्यापैकी कुणीही मोठी खेळी साकारू शकले नाहीत. हर्षितने ब्रूक व कर्णधार जोस बटलरचा (६) अडसर दूर केला. तर अक्षरने धोकादायक रूटचा त्रिफळा उडवला.
हार्दिकने मग रशिद व मार्क वूडला माघारी पाठवले. ॲटकिन्सनने अखेरीस १९ चेंडूंत ३८ धावा फटकावून भारताचा विजय काहीसा लांब ढकलला. मात्र तोसुद्धा अक्षरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला आणि ३४.२ षटकांत इंग्लंडचा संघ २१४ धावांत गारद झाला. भारतासाठी अक्षर, हर्षित, अर्शदीप व हार्दिक यांनी प्रत्येकी २, तर कुलदीप व सुंदरने प्रत्येकी एक बळी मिळवला. आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी रोहितला मालिका विजयाचा चषक प्रदान केला. त्याने अपेक्षेप्रमाणे तो हर्षित व वरुण या नव्या दमाच्या खेळाडूंना तो सुपुर्द केला. आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतीय संघ अपराजित राहील, अशीच आशा तमाम चाहते बाळगून आहेत.
संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकांत सर्व बाद ३५६ (शुभमन गिल ११२, श्रेयस अय्यर ७८, विराट कोहली ५२; आदिल रशिद ४/६४) विजयी वि.
इंग्लंड : ३४.२ षटकांत सर्व बाद २१४ (टॉम बॅन्टन ३८, गस ॲटकिन्सन ३८; अक्षर पटेल २/२२, हर्षित राणा २/३१)
निकाल : भारतीय संघ मालिकेत ३-० असा विजयी
सामनावीर आणि मालिकावीर : शुभमन गिल