

मुंबई : सध्याचे चित्र पाहता भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी रणजी स्पर्धेपेक्षा आयपीएलमधील कामगिरी महत्त्वाची आहे, असे परखड मत मुंबईचा अनुभवी क्रिकेटपटू सिद्धेश लाडने व्यक्त केले आहे.
लवकरच सुरू होणाऱ्या टी-२० मुंबई लीगमध्ये ३४ वर्षीय सिद्धेश खेळताना दिसेल. त्यापूर्वी ‘नवशक्ति’शी साधलेल्या खास संवादात सिद्धेशने वैभव सूर्यवंशी, आयपीएल, रणजीतील कामगिरी व अन्य मुद्द्यांवर भाष्य केले. “सध्या आयपीएलमध्ये कामगिरी करणे अधिक महत्त्वाचे आहे. रणजीच्या तुलनेत आयपीएलच्या कामगिरीला महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे युवा पिढीला मी नक्कीच सल्ला देईन की मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष द्या,” असे सिद्धेश म्हणाला. सिद्धेश हा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने रणजी स्पर्धेत मुंबईकडून चमकदार कामगिरी करत आहे.
“मी रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी केली, म्हणून मला निवडा असे माझे म्हणणे नाही. मात्र जम्मूचा वेगवान गोलंदाज आकीब नबीला संधी मिळणे गरजेचे होते. अशा वेळी संधी मिळाली नाही, तर खेळाडूचे खच्चीकरण होते. आयपीएलमध्ये खेळणाऱ्यांनाही ठाऊक आहे की रणजी स्पर्धा खेळणे किती आव्हानात्मक असते. जर तुम्हाला आयपीएलमध्ये संधी लाभली नाही, तर भारतीय संघात स्थान मिळवणे सध्या कठीण आहे. आयपीएलच्या एका हंगामाच्या बळावरही तुम्ही भारतासाठी किमान टी-२० प्रकारात पदार्पण करू शकता,” असेही सिद्धेशने सांगितले.
असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी रणजी स्पर्धेत छाप पाडली. मात्र आयपीएलमध्ये त्यांच्यावर कोणी बोली लावली नाही. किंवा त्यांना संधी मिळून फारशी छाप पाडता आली नाही. त्यामुळे ते खेळाडू भारतीय संघात स्थान मिळवू शकले नाहीत, असेही सिद्धेशने नमूद केले. एकूणच सिद्धेशने मांडलेले मत सध्या योग्य असल्याचेच दिसून येते.
मुंबईतही गवसतील वैभवसारखे खेळाडू
वैभव सूर्यवंशीकडे अफाट कौशल्य आहे. त्याच्या वयात इतक्या सहज फटकेबाजी करणे सोपे नाही. मात्र मुंबईतही वैभवसारखे कौशल्य असणारे खेळाडू आहेत. आगामी काही वर्षांत हे खेळाडू क्रिकेटला नव्या उंचीवर नेतील, असे सिद्धेश म्हणाला. तसेच युवा खेळाडूंनी कमी वयात यश मिळाल्यावर पाय जमिनीवरूच टिकवून ठेवणे गरजेचे असल्याचेही त्याने सांगितले.