सिंधू विजेतेपद समीप! अंतिम फेरीत चीनच्या वँग झी यी हिच्याशी लढत

दोन वेळा ऑलिम्पिक पदक पटकावणाऱ्या पी. व्ही. सिंधूने दमदार कामगिरी करत मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदाच्या दिशेने झेप घेतली आहे.
सिंधू विजेतेपद समीप! अंतिम फेरीत चीनच्या
वँग झी यी हिच्याशी लढत
Published on

क्वालालंपूर : दोन वेळा ऑलिम्पिक पदक पटकावणाऱ्या पी. व्ही. सिंधूने दमदार कामगिरी करत मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदाच्या दिशेने झेप घेतली आहे. तिने थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान हिचा पराभव करत मलेशिया मास्टर्स स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. आता रविवारी रंगणाऱ्या जेतेपदाच्या लढतीत तिची गाठ दुसऱ्या मानांकित चीनच्या वँग झी यी हिच्याशी पडेल.

पाचव्या मानांकित सिंधूला गेल्या दोन वर्षांत एकही महत्त्वाचे जेतेपद पटकावता आले नसले तरी या स्पर्धेत मात्र तिने चांगली कामगिरी केली आहे. शनिवारी रंगलेल्या उपांत्य फेरीत तिने जागतिक क्रमवारीत २०व्या स्थानी असलेल्या बुसानन हिला १३-२१, २१-१६, २१-१२ असे पराभूत केले. जवळपास ८८ मिनिटे रंगलेल्या या अटीतटीच्या लढतीत सिंधूने पहिला गेम गमावल्यानंतरही पुढील दोन गेम जिंकून बाजी मारली.

सिंधूने याआधी २०२२ साली सिंगापूर ओपनचे जेतेपद तर माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे. तिचा हा बुसाननविरुद्धचा १८वा विजय ठरला. बुसानन हिने आपल्या कारकीर्दीत फक्त एकदाच (२०१९ साली हाँगकाँग ओपन) सिंधूला पराभूत केले आहे. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आपले तिसरे ऑलिम्पिक पदक पटकावण्यासाठी उत्सुक असलेल्या सिंधूचा या स्पर्धेचे जेतेपद पटकावून आपला आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न असेल. सिंधूने गेल्या तीन सामन्यांत वँगला दोनवेळा पराभवाची धूळ चारली आहे.

गेल्या काही वर्षांत कॅरोलिना मारिन, ताय झू यिंग, चेन यू फेई आणि अकाने यामागुची यांसारख्या अव्वल खेळाडूंना हरवणाऱ्या सिंधूने पॅरिस ऑलिम्पिककडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे या स्पर्धेचे जेतेपद तिच्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जात आहे. बुसानन हिने नेहमीप्रमाणे सुरुवातीला सिंधूला कडवी लढत दिली. बुसाननने पहिल्या गेममध्ये ८-६ आणि नंतर १५-९ अशी आघाडी घेत दमदार मजल मारली होती. त्यानंतर बुसाननने चांगला खेळ करत पहिला गेम सहजपणे आपल्या नावावर केला.

दुसऱ्या गेममध्येही सिंधू ४-६ अशा पिछाडीवर होती. मात्र त्यानंतर सिंधूने जोमाने पुनरागमन करत ८-७ आणि नंतर १६-१३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सलग पाच गुण मिळवत सिंधूने सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सिंधूने ४-१ अशी सुरुवात करत आपली आघाडी ८-३ अशी वाढवली. महत्त्वाच्या क्षणी सिंधूने ११-५ अशी पुढे असताना बुसाननला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. १७-१० अशा स्थितीतून सिंधूने गुण वसूल करत हा सामना जिंकत आगेकूच केली.

logo
marathi.freepressjournal.in