पुनरागमनासाठी सिंधू सज्ज! आशियाई सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून मलेशिया येथे प्रारंभ

दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू अखेर पाच महिन्यांच्या कालावधीनंतर पुनरागमन करण्यास सज्ज आहे.
पुनरागमनासाठी सिंधू सज्ज! आशियाई सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून मलेशिया येथे प्रारंभ

शाह आलम (मलेशिया) : दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू अखेर पाच महिन्यांच्या कालावधीनंतर पुनरागमन करण्यास सज्ज आहे. मलेशिया येथे मंगळवारपासून आशियाई सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी २८ वर्षीय सिंधूचा भारताच्या महिला संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच भारतीय पुरुष संघाच्या कामगिरीकडेही चाहत्यांचे लक्ष असेल. पॅरिस ऑलिम्पिकच्या दृष्टीने ही स्पर्धा अत्यंत मोलाची असेल.

यंदाचे वर्ष हे ऑलिम्पिकचे वर्ष असून २६ जुलैपासून क्रीडा विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा पॅरिस सुरू होईल. मात्र २८ वर्षीय सिंधू ऑक्टोबरमध्ये अखेरची स्पर्धा खेळली होती. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या त्या फ्रेंच ओपन स्पर्धेत सिंधू उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली होती. याच स्पर्धेत सिंधूच्या गुडघ्याला दुखापत झाली व त्यानंतर शस्त्रक्रियेमुळे तिला कोर्टपासून दूर रहावे लागले. यादरम्यानच्या काळात सिंधूने राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली बंगळुरू येथे सरावही केला. आता सिंधूच्या पुनरागमनामुळे तिच्यावरच भारतीय महिला संघाची प्रामुख्याने भिस्त असेल. जागतिक क्रमवारीत सिंधू ११व्या स्थानी आहे. क्रमवारीत अव्वल १६ मध्ये असणाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या अखेरीस थेट ऑलिम्पिक पात्रता मिळणार आहे. त्यामुळे सिंधूला आता क्रमवारीतील स्थान टिकवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.

दरम्यान, भारतीय महिला संघाचा चीनसह डब्ल्यू-गटात समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक गटातून दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल होणार असल्याने भारतीय महिला संघाची आगेकूच पक्की आहे. सिंधूव्यतिरिक्त एकेरीत अश्मिता छलिहा, तन्वी शर्मा, तर दुहेरीत ट्रीसा जॉली-गायत्री गोपिचंद, अश्विनी पोनप्पा-तनिशा क्रॅस्टो यांच्यावर भारताची मदार असेल. ही स्पर्धा सांघिक असली तरी स्पर्धेच्या अखेरीस प्रत्येक खेळाडूला ऑलिम्पिकच्या दृष्टीने वैयक्तिक रेटिंग गुण देण्यात येणार आहेत. भारताच्या दोन्ही संघांत प्रत्येकी १० खेळाडूंचा समावेश आहे.

सिंधूला गेल्या वर्षातील १९ पैकी सात स्पर्धांमध्ये पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. मुख्य म्हणजे २०२३मध्ये सिंधूला एकही स्पर्धा जिंकता आली नाही. माद्रिद मास्टर्स वगळता तिला वर्षभरात एकाही स्पर्धेची अंतिम फेरीसुद्धा गाठता आली नाही.

प्रणॉय, सात्त्विक-चिरागवर पुरुष संघाची भिस्त

२०२२मध्ये ऐतिहासिक थॉमस चषकाचे विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय पुरुष संघाची मदार एकेरीत प्रामुख्याने एच. एस. प्रणॉय, तर दुहेरीत सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांच्यावर असेल. भारताला अ-गटात चीन व हाँगकाँग यांचा सामना करायचा आहे. लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत यांच्यासाठी ही स्पर्धा निर्णायक ठरेल. तसेच ध्रुव कपिला, चिराग सेन यांनाही छाप पाडण्याची संधी आहे. बुधवारी भारतीय पुरुष संघ सकाळी १०.३० वाजता पहिला सामना खेळेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in