वर्ल्ड टूर फायनल्समधून सिंधूची दुखापतीमुळे माघार

१४ डिसेंबरपासून वर्ल्ड टूर फायनल्सला प्रारंभ होणार असून सिंधूच्या अनुपस्थितीचा भारताला मोठा फटका बसणार
वर्ल्ड टूर फायनल्समधून सिंधूची दुखापतीमुळे माघार

डाव्या पायाला झालेली दुखापत अद्याप पूर्णपणे बरी न झाल्यामुळे दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती भारतीय बॅडमिंटनपटू आगामी वर्ल्ड टूर फायनल्समधून (जागतिक मालिकेचा अंतिम टप्पा) माघार घेतली आहे. २०१८च्या विजेत्या सिंधूला ऑगस्ट महिन्यात राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती.

यंदा चीन येथे १४ डिसेंबरपासून वर्ल्ड टूर फायनल्सला प्रारंभ होणार असून सिंधूच्या अनुपस्थितीचा भारताला मोठा फटका बसणार आहे. “सिंधूला डॉक्टरांनी जोखीम न पत्करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील हंगामापर्यंत ती पूर्णपणे तंदुरुस्त होईल. मात्र आता तिने पायावर जोर दिल्यास दुखापत अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे नाइलाजास्तव सिंधूला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागत आहे,” असे सिंधूचे वडील पी. व्ही. रामण यांनी सांगितले. सिंधूने सध्या सरावाला प्रारंभ केला असला तरी पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी तिला जानेवारी महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असेही तिच्या वडिलांनी सांगितले.

लक्ष्यही मुकणार; प्रणॉयवर मदार

भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननेसुद्धा आधीच या स्पर्धेतून माघार घेतली होती. तसेच किदम्बी श्रीकांतच्या समावेशाबाबतही साशंकता कायम असून अशा स्थितीत पुरुष एकेरीत फक्त एच. एस. प्रणॉयवर भारताच्या आशा असतील. श्रीकांतला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये किमान उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणे गरजेचे आहे. पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी यांच्यावर भारताची भिस्त असेल.

logo
marathi.freepressjournal.in