मुंबई : टेनिस प्रीमियर लीगच्या सहाव्या पर्वासाठी नव्या केंद्राची निवड केली आहे. भव्य स्वरूपात लीग पार पडण्यासाठी या वेळी मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाची (सीसीआय) निवड करण्यात आली आहे. ही लीग ३ ते ८ डिसेंबरदरम्यान खेळवण्यात येणार आहे.
टेनिस प्रीमियर लीग २०२४मधील टप्प्यासाठी टेनिस विश्वातील काही प्रमुख खेळाडू भारतात खेळणार आहेत. यामध्ये फ्रान्सचा ह्युगो ह्यूस्टन (जागतिक क्रमवारी ६१), भारताचा सुमित नागल (जागतिक क्रमवारी ७४, भारतातील अव्वल मानांकित) या परुष, तर पोलंडची मॅग्डा लिनेट (जागतिक क्रमवारी ४१), अर्मेनियाची एलिना अवनेसियान (जागतिक क्रमांक ५२) या महिला खेळाडूंचा समावेश आहे. टेनिस प्रीमियर लीगच्या पाच यशस्वी पर्वांनंतर आयपीएलप्रमाणे टीपीएलची देखील चर्चा वाढली आहे. लीगमुळे २५ गुणांची पद्धती चाहत्यांना आकर्षित करत आहे.
टेनिस चाहत्यांचे लक्ष वेधून सर्व फ्रँचायझी संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याकरिता ५ सामने खेळतील. प्रत्येक सामन्यात पुरुष, महिला एकेरी, मिश्र दुहेरी, पुरुष दुहेरी अशा लढतींचा समावेश असेल. प्रत्येक सामन्यात १०० गुण असून एका विजयासाठी २५ गुण देण्यात येतील. उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यासाठी प्रत्येक संघ साळखी टप्प्यात एकूण ५०० गुणांसाठी खेळतील. गुणतालिकेतील पहिले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
स्पर्धेविषयी महत्त्वाचे
या लीगमध्ये गतविजेते बंगळुरू एसजी पायपर्स, पीबीजी पुणे जग्वार्स, बंगाल विझार्ड्स, पंजाब पॅट्रियट्स, हैदराबाद स्ट्रायकर्स, गुजरात पँथर्स, मुंबई लिओन आर्मी या सात संघांचा समावेश आहे.
गुजरात स्टेट टेनिस संघटना (जीएसटीए), दिल्ली लॉन टेनिस संघटना (डीएलटीए), महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) यांच्याशी टीपीएलने परस्पर सामंजस्याचा करार केला असून, त्यानुसार त्या राज्यात जिल्हा मानांकन स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.
भारतातील विविध प्रदेशातून शंभरहून अधिक अकादमी टीपीएल ॲपशी संलग्न करण्यात आल्या आहेत. टीपीएल ॲप संपूर्ण भारतातील टेनिस समुदायाला जोडते.