SL vs NZ : श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिसचा झंझावात; सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी केली बरोबरी

श्रीलंकेचा २५ वर्षीय प्रतिभावान डावखुरा फलंदाज कामिंदू मेंडिसची अविश्वसनीय कामगिरी सुरूच आहे.
शतकानंतर बॅट उंचावताना कामिंदू मेंडिस
शतकानंतर बॅट उंचावताना कामिंदू मेंडिस(एक्स)
Published on

गॉल : श्रीलंकेचा २५ वर्षीय प्रतिभावान डावखुरा फलंदाज कामिंदू मेंडिसची अविश्वसनीय कामगिरी सुरूच आहे. शुक्रवारी त्याने कारकीर्दीतील आठव्या कसोटीतच पाचवे शतक झळकावण्याची किमया साधली. यासोबतच त्याने ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या एका विक्रमाशी बरोबरी केली.

ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी

कांमिदूने ८ कसोटींतील १३ डावांतच १,००० धावांचा टप्पा पार केला. ब्रॅडमन यांनीही १९३०मध्ये १३ डावांतच १,००० धावा केल्या होत्या. इंग्लंडचे हर्बट सुटलिफ व वेस्ट इंडिजचे एव्हर्टन विक्स यांनी १२ डावांत १,००० धावा केल्या होत्या. त्यामुळे मेंडिस व ब्रॅडमन आता संयुक्तपणे सर्वात जलद १,००० कसोटी धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. तसेच गेल्या ७५ वर्षांत इतक्या जलद १,००० धावा करणारा मेंडिस हा विश्वातील पहिलाच खेळाडू ठरला. कामिंदूने आतापर्यंत ५ कसोटी शतकांसह ४ अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याने गेल्या तिन्ही मालिकांमध्ये किमान १ शतक व दोन अर्धशतके झळकावली असून तूर्तास त्याची सरासरी ९१.२७ आहे.

कामिंदूने २५० चेंडूंत साकारलेली नाबाद १८२ धावांची खेळी आणि कुशल मेंडिसनेसुद्धा १४९ चेंडूंत फटकावलेल्या नाबाद १०६ धावांच्या बळावर श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ५ बाद ६०२ धावांवर पहिला डाव घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडची २ बाद २२ अशी अवस्था करून श्रीलंकेने लढतीवर पकड मिळवली. दुसऱ्या दिवसअखेर केन विल्यम्सन ६, तर नाइट-वॉचमन एजाझ पटेल शून्यावर खेळत असून न्यूझीलंडचा संघ अद्याप ५८० धावांनी पिछाडीवर आहे. असिथा फर्नांडोने टॉम लॅथमला (२), तर प्रभात जयसूर्याने डेवॉन कॉन्वेला (९) बाद केले.

तत्पूर्वी, गुरुवारच्या ३ बाद ३०६ धावांवरून पुढे खेळताना कामिंदू व अँजेलो मॅथ्यूज यांनी उत्तम सुरुवात केली. कामिंदूने १६ चौकार व ४ षटकारांसह कारकीर्दीतील पाचवे शतक झळकावले. मात्र मॅथ्यूजला (८८) शतकाने हुलकावणी दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १०७ धावांची भर घातली. त्यानंतर कर्णधार धनंजय डीसिल्व्हाने (४४) कामिंदूसह पाचव्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी रचली. फिलिप्सने मॅथ्यूज व धनंजयला जाळ्यात अडकवले.

धनंजय बाद झाल्यावर ५ बाद ४०२ धावांवरून कुशल व कामिंदू या मेंडिस दुकलीची जोडी जमली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी तब्बल २०० धावांची अभेद्य भागीदारी रचली.

कामिंदूने सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवताना नाबाद १८२ धावा केल्या, तर कुशलने ६ चौकार व ३ षटकारांसह १०वे कसोटी शतक साकारले. अखेर १६३.४ षटकांत ६०२ धावा केल्यावर श्रीलंकेने डाव घोषित केला. त्यामुळे कामिंदूला द्विशतक साकारण्याची संधी लाभली नाही. मात्र कामिंदूच्या दीडशतकामुळे श्रीलंकेने सहाशेहून अधिक धावांचा डोंगर उभारला.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका (पहिला डाव) : ५ बाद ६०२ घोषित (कामिंदू मेंडिस नाबाद १८२, दिनेश चंदिमल ११६, कुशल मेंडिस नाबाद १०६; ग्लेन फिलिप्स ३/१४१)

न्यूझीलंड (पहिला डाव) : १४ षटकांत २ बाद २२ (केन विल्यम्सन नाबाद ६, डेवान कॉन्वे ९; प्रभात जयसूर्या १/३)

logo
marathi.freepressjournal.in