दुबई : भारतीय महिला संघाची डावखुरी सलामीवीर स्मृती मानधनाने मंगळवारी जागतिक फलंदाजांच्या क्रमवारीत दोन स्थानांनी आगेकूच केली. २७ वर्षीय स्मृतीने ६९६ गुणांसह चौथा क्रमांक पटकावला असून इंग्लंडची नॅट शीव्हर-ब्रंट, श्रीलंकेची चामरी अटापटू आणि ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी अनुक्रमे पहिल्या तीन स्थानांवर विराजमान आहेत. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर १०व्या स्थानी कायम आहे. गोलंदाजांमध्ये भारताच्या दीप्ती शर्माची तिसऱ्यावरून चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. अष्टपैलूंमध्ये ती पाचव्या क्रमांकावर आहे. टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत स्मृतीने चौथे स्थान कायम राखले आहे. सांघिक क्रमवारीचा विचार करता एकदिवसीयमध्ये भारत चौथ्या, तर टी-२०मध्ये तिसऱ्या स्थानी आहे. अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलिया दोन्ही प्रकारांत अग्रस्थानी विराजमान आहे.