
नॉटिंघम : कर्णधार स्मृती मानधनाचे झंझावाती शतक, त्याला गोलंदाज श्री चरणीने दिलेली साथ या बळावर भारतीय महिला संघाने यजमान इंग्लंडवर ९७ धावांनी दणदणीत विजय मिळवत टी-२० मालिकेची सुरुवात दमदार केली.
भारताने दिलेले २११ धावांचे लक्ष्य सर करताना इंग्लंडची दमछाक झाली. श्री चरणीने ४ बळी मिळवत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. तिला दीप्ति शर्मा, राधा यादव यांच्या प्रत्येकी २ विकेट्सची साथ मिळाल्याने इंग्लंडच्या धावसंख्येला ब्रेक लागला. इंग्लंडचा डाव१४.५ षटकांत ११३ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यातील विजयासह भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
नाणेफेकीचा कौल जिंकत इंग्लंडच्या महिला संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतली. मात्र त्यांचा हा निर्णय भारतीय फलंदाजांनी चुकीचा ठरवला. कर्णधार स्मृती मानधनाने टी-२० क्रिकेटमधील पहिले शतक झळकावत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात शनिवारी भारताला २१० धावांचा डोंगर उभारून दिला.
नियमित कर्णधार हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत स्मृतीच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची धुरा आहे. स्मृती आणि शफाली या सलामीच्या जोडीने ८.३ षटकांत ७७ धावांची दणदणीत सुरुवात केली. शफाली बाद झाल्यानंतर स्मृतीने हर्लिन देओलच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी रचली. ४३ धावा करून हर्लिन माघारी परतली.
मानधनाने इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसे काढली. चौथ्या षटकात डावखुरी गोलंदाज लिनसे स्मिथला स्मृतीने ३ चौकार लगावले. त्यानंतर तिने दुसरी फिरकीपटू सोफी एक्लेस्टोनला सातव्या षटकात २ षटकार लगावले.
स्मृतीचा शतकी झंझावात
मानधनाने (६२ चेंडूंत ११२ धावा) आत्मविश्वासाने फलंदाजी करत भारतीय महिला संघाला दणदणीत सुरुवात करून दिली. टी-२० क्रिकेटमध्ये स्मृतीची भारतातर्फे सर्वाधिक धावांची खेळी ठरली आहे. याआधी हा विक्रम हरमनप्रीतच्या नावे होता. तिने टी-२० क्रिकेटमध्ये १०३ धावा केल्या होत्या. मात्र तिला स्मृतीने मागे टाकले.