

रायपूर : भारतीय महिला क्रिकेटमध्ये शुक्रवारपासून स्मृती पर्वाला प्रारंभ होईल. महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाच्या नेतृत्वात भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० मालिकेत दोन हात करणार आहे. हरमनप्रीत कौरने तिन्ही प्रकारांतील कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर ३० वर्षीय स्मृती प्रथमच पूर्ण स्वरुपात भारताचे कर्णधारपद भूषवणार आहे. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर उभय संघांतील पहिली लढत होईल.
३७ वर्षीय हरमनप्रीतने काही दिवसांपूर्वीच भारताचे कर्णधारपद सोडून फक्त खेळाडू म्हणून खेळण्याचा निर्णय जाहीर केला. तिच्या नेतृत्वात भारताने २०२५मध्ये विश्वचषक उंचावला. तसेच २०२३ व २०२६मध्ये आशियाई स्पर्धेचे सुवर्णपदक काबिज केले. हरमनप्रीत अनुपस्थितीत असली की स्मृती भारताचे नेतृत्व करायचे. टी-२० विश्वचषकात भारताला एकदाही जेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे स्मृतीच्या नेतृत्वात प्रामुख्याने टी-२० प्रकारात भारतीय संघ कामगिरी सुधारेल, अशी अपेक्षा आहे.
भारताने आशियाई स्तरावर आपला दबदबा कायम ठेवला असला, तरी टी-२० विश्वचषकात सलग दोन वेळा साखळीतच गाशा गुंडाळणे, ही बाब संघातील त्रुटी स्पष्ट करणारी ठरली आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांचा सातत्याने मुकाबला करण्यासाठी भारताला तिन्ही विभागांत सुधारणा करणे गरजेचे आहे. भारताने गेल्या वर्षी ऐतिहासिक एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता, परंतु २०२७मध्ये देशातच होणारी महिला चॅम्पियन ट्रॉफी उंचावणे संघासाठी अधिक कठीण आव्हान असणार आहे.
दरम्यान, डावखुरी सलामीवीर व गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय महिला संघाची उपकर्णधार असलेली स्मृती आधीपासूनच कर्णधारपदासाठी आघाडीची दावेदार मानली जात होती. हरमनप्रीतला एकदिवसीय आणि कसोटी संघाचे नेतृत्व पुढेही करायचे होते. मात्र, बोर्डाला तिन्ही प्रकारांत नेतृत्वबदल हवा होता. स्मृतीच्या नेतृत्वात बंगळुरूने दोन वेळा महिलांच्या डब्ल्यूपीएलचे जेतेपद मिळवले आहे.
दुसरीकडे गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामना जिंकल्याने आत्मविश्वास उंचावलेल्या झिम्बाब्वे संघासाठी ही मालिका एक उत्तम संधी ठरणार आहे. जोसेफिन एन्कोमो झिम्बाब्वे संघाचे नेतृत्व करणार आहे. टी-२० मालिकेनंतर दोन्ही संघ तीन एकदिवसीय सामन्यांसाठी वडोदरा येथे रवाना होतील.
शफाली, हरमनप्रीतवर लक्ष
स्मृती आणि शफाली वर्मा यांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतरही संघाला मधल्या षटकांत धावगती कायम राखण्यात अडचणी येत आहेत. तिसऱ्या क्रमांकासाठी सतत प्रयोग सुरू असून हरमनप्रीतचा फॉर्म गेल्या काही काळापासून चिंतेचा विषय ठरला आहे. तसेच तळाच्या फळीत रिचा घोषला साथ देण्यासाठी अधिक पॉवर हिटर्सना तयार करण्याची भारताला गरज आहे. क्षेत्ररक्षणाने अनेक प्रसंगी संघाची निराशा केली असून त्यात लक्षणीय सुधारणा आवश्यक आहे. गोलंदाजी विभागात नंदनी शर्मा यांची अलीकडील कामगिरी मोठी सकारात्मक बाजू राहिली आहे. फिरकी हा भारताचा पारंपरिक वारसा राहिला असून युवा श्री चरणी हिने प्रभावित केले आहे.
प्रतिस्पर्धी संघ
झिम्बाब्वे : जोसफीन एन्कोमो (कर्णधार), बीलव्ह बीझा, चिपो मुगेरी, केलिस एन्ढोलवू, मिशेल मावुंगा, फ्रान्सिस्का चिपरे, ओलिंडर केर, कुझाई चिगोरा, एन्याशा ग्वान्झुरा, नोम्व्हेलो सिबांडा, लॉर्न फिरी, चियेझा धुरूरू, मॉडस्टर मुपाचिक्वा, तेंदई माकुशा, शेर्न मेयर्स.
भारत : स्मृती मानधना (कर्णधार), शफाली वर्मा, निकी प्रसाद, हरमनप्रीत कौर, अनुष्का शर्मा, रिचा घोष, गुणालन कमलिनी, दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, नंदिनी शर्मा, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी, जिंतामणी कलिता, मिन्नू मणी.
वेळ : सायंकाळी ७ वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २ वाहिनी आणि जिओहॉटस्टार ॲप