
सलामीवीर स्मृती मानधनाच्या (५३ चेंडूंत नाबाद ७९ धावा) शानदार अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडविरुद्धचा दुसरा टी-२० सामना आठ विकेट्स राखून जिंकत भारतीय महिला संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. स्मृतीने आपल्या चमकदार खेळीत तब्बल १३ चौकार लगावले.
इंग्लंडने सहा गडी गमावून १४२ धावा केल्यानंतर भारतीय संघाने विजयी लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. दोन गडी गमावून १४६ धावा करीत भारताने २० चेंडू राखून विजय मिळविला. १४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सहाव्याच षट्कात शेफाली वर्मा १७ चेंडूंत २० धावा करून बाद झाली. इक्कलेसस्टोनने स्वत:च्याच गोलंदाजीवर तिचा झेल टिपला. तोपर्यंत पॉवरप्लेमध्ये संघाच्या ५५ धावा झाल्या होत्या. नवव्या षट्कातील चौथ्या चेंडूवर दयालन हेमलता १० चेंडूंत ९ धावा करून बाद झाली. भारताची ही दुसरी विकेट ७७ धावांवर पडली. हेमलताला फ्रेया डेव्हिसने त्रिफळाचीत केले. त्यानंतर सलामीवीर स्मृती मानधना (५३ चेंडूंत नाबाद ७९ धावा) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (२२ चेंडूंत नाबाद २९ धावा) यांनी दमदार भागीदारी करीत १६.४ षट्कांत विजयी लक्ष्य गाठले. इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड संघाने निर्धारित २० षट्कांत सहा विकेट्स गमावून १४२ धावा केल्या. इंग्लंडच्या फ्रेया केम्पने ३७ चेंडूंत नाबाद ५१ धावा केल्या; तर मायिया बाउचियरने २६ चेंडूंत ३४ धावा केल्या. या दोघींव्यतिरिक्त इतर कोणत्याही बॅटरला चमकदार खेळी करता आली नाही. भारताकडून स्नेह राणाने तीन विकेट्स घेतल्या. रेणुका सिंग आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट मिळविली. भारतीय संघाला पहिल्या सामन्यात नऊ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. या तीन सामन्यांच्या मालिकेत आपले आव्हान टिकविण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे आवश्यक होते.
खराब फटका टाळण्याचे प्रयत्न केले - मानधना
स्मृती मानधना म्हणाली की, “मागील सामन्यानंतर आम्हाला शानदार मुसंडी मारून मालिकेत बरोबरी साधायची होती. खराब फटका खेळून कुठल्याही प्रकारचा दबाव संघावर येऊ नये, याची दक्षता आम्ही घेतली. मला शानदार योगदान देता आले. याचा विशेष आनंद आहे.”