...म्हणुन मी अतिशय निराश झालो आहे - जसप्रीत बुमराह

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आयसीसी पुरुषांच्या टी-२० विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे
...म्हणुन मी अतिशय निराश झालो आहे - जसप्रीत बुमराह
Published on

ऑस्ट्रेलियात येत्या १६ ऑक्टोबरपासून होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अधिकृत घोषणा करताच बुमराह भावूक झाला. बुमराह म्हणाला की, ‘‘टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्यामुळे मी अतिशय निराश झालो आहे.’’

बीसीसीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आयसीसी पुरुषांच्या टी-२० विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.” यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना बुमराह म्हणाला, “यावेळेस मी टी-२० विश्वचषकाचा भाग नसणार, या भावनेने मी खूपच निराश झालो आहे; मात्र माझ्या प्रियजनांकडून मला मिळालेल्या शुभेच्छा, काळजी आणि पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे.” बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे टी-२० विश्वचषकातून बाहेर झाल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्याआधीच्या सराव सत्रादरम्यान बुमराहला पाठदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल करण्यात आले. तेथे त्याच्या काही चाचण्या करण्यात आल्यानंतर तो टी-२० विश्वचषकात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. बुमराह टी-२० विश्वचषकातून बाहेर झाल्याच्या बातमीनंतर सोशल मीडियावरही अनेक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही बुमराहला लवकरच पुन्हा खेळताना पाहू, अशी आशा व्यक्त केली होती.

logo
marathi.freepressjournal.in