
मुंबई : टी-२० मुंबई लीगच्या तिसऱ्या पर्वातील सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या सोबो मुंबई फाल्कन्स आणि ट्रायम्फ नाइट्स मुंबई नॉथ ईस्ट यांच्यातील लढतीत अखेर श्रेयस अय्यरच्या फाल्कन्सने बाजी मारली. वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात त्यांनी सूर्यकुमार यादवच्या नाइट्स संघावर ४ गडी आणि ४ चेंडू राखून मात केली. याबरोबरच फाल्कन्स संघाने सलग तिसरा विजय नोंदवला.
अंक्रिश रघुवंशीची पॉवर-प्लेमधील फटकेबाजी आणि विनायक भोईरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे फाल्कन्सने बाजी मारली. आयपीएलमध्ये पंजाब किंग्जला अंतिम फेरीपर्यंत मजल मारून दिल्यानंतर श्रेयस गुरुवारी मुंबईत परतला. मग शुक्रवारी तो सोबो फाल्कन्सचे नेतृत्व करण्यासाठी वानखेडेच्या मैदानात उतरला. श्रेयस व सूर्या यांची फलंदाजी पाहण्यासाठी वानखेडेवर दर्दी क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
प्रथम फलंदाजी करताना नाइट्स संघाने २० षटकांत ५ बाद १४५ धावा केल्या. सूर्यकुमार १ धावेवर बाद झाला. मात्र सिद्धांत अधातरावने ५७ धावांची खेळी साकारताना सूर्यांश शेडगेसह (नाबाद ४९) मोलाची भागीदारी रचली. विनायक भोईर आणि सिद्धार्थ राऊत यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रेयसही (१३) छाप पाडू शकला नाही. एकवेळ संघ ५ बाद ७५ अशा स्थितीत होता. मात्र रघुवंशी (२५ चेंडूंत ४२) व विनायक (३३) यांनी दमदार योगदान दिले. १८ चेंडूंत ३० धावांची गरज असताना विनायकने उपयुक्त फटकेबाजी केली. अखेरीस पाच चेंडूंत ५ धावांची आवश्यकता असताना आकाश पारकरने षटकार लगावून विजय साकारला.
वांद्रे ब्लास्टर्सची टायगर्सवर मात
शुक्रवारी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात वांद्रे ब्लास्टर्सने आकाश टायगर्सवर १ धावेच्या फरकाने रोमांचक विजय मिळवला. वेगवान गोलंदाज धनित राऊतच्या (४/२९) धारदार स्पेलच्या जोरावर हा विजय मिळवला. अनुभवी सलामीवीर जय बिस्तच्या अर्धशतकाने आकाश टायगर्सला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते, पण त्याची खेळी व्यर्थ ठरली.