
कोलकाता : तंदुरुस्ती राखणे आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा २०२७ मध्ये भारतीय संघात स्थान मिळवणे हे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासाठी सोपे नसेल, असे मत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले.
आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे, जसे अन्य खेळाडूंसोबत होते तसेच आता भारतीय संघात स्थान मिळवणे हे रोहित आणि कोहली यांच्यासाठी कठीण असेल असे गांगुली म्हणाला. निवासस्थानी घेतलेल्या दीर्घ मुलाखती दरम्यान गांगुली वृत्तसंस्थेशी बोलत होता.
दक्षिण आफ्रिका, झिम्बाम्बे आणि नामिबिया येथे होणाऱ्या आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत कोहली हा ३८ वर्षांचा होणार असून रोहित ४० वर्षांचा होईल. तोपर्यंत भारतीय संघ जवळपास ९ मालिका खेळणार असून त्यात २७ एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. याचा अर्थ रोहित आणि विराट हे वर्षाला जवळपास १५ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत. वर्षाला १५ सामने खेळणे सोपे नसेल, असे गांगुलीला वाटते.
कोहली आणि रोहित या दुकलीने २५ हजार धावांसह एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकत्रित ८३ शतके झळकावली आहेत. नुकतेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर या दुकलीने एकदिवसीय क्रिकेटकडे लक्ष केंद्रित केले आहे.
कोहली आणि रोहित यांना काही सल्ला देणार का? असे विचारले असता गांगुली म्हणाला की, माझ्याप्रमाणे त्या दोघांनाही खेळाची चांगली जाणीव आहे. त्यामुळे मी त्यांना सल्ला देऊ शकत नाही, असे गांगुली म्हणाला. कोहलीचा बदली खेळाडू मिळणे सोपे नसेल, परंतु कोहली, रोहित यांनी निवृत्ती घेतल्यानंतरही गांगुली यांना भारतीय संघाची चिंता वाटत नाही.
‘राजकारण नको ; प्रशिक्षकपदासाठी उत्सुक’
राजकारणात रस नाही, मात्र भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी नकार दिलेला नसल्याचे गांगुली म्हणाला. पुढच्या महिन्यात गांगुली ५३ वर्षांचा होईल. २०१८-१९ आणि २०२२-२४ मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाबाबत मी कधीच विचार केलेला नाही. कारण माझ्या खांद्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या होत्या. स्पर्धात्मक क्रिकेटमधून २०१३ मध्ये निवृत्ती स्विकारल्यानंतर मी बीसीसीआयचा अध्यक्ष झालो, असे गांगुली म्हणाला. पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीतून राजकारणात प्रवेश करणार का? असा सवाल केल्यावर गांगुली हसला आणि म्हणाला की, राजकारणात मला रस नाही. मी अजून फक्त ५३ वर्षांचा आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी मी उत्सुक आहे. पुढे काय होते ते पाहूया, असे गांगुली म्हणाला.