पाकला नमवत दक्षिण आफ्रिका डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये; कगिसो रबाडा, मार्को जान्सेन यांच्या उपयुक्त खेळी

कगिसो रबाडा आणि मार्को जान्सेन यांनी वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बासविरुद्ध शानदार फलंदाजी करत पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेला २ विकेटने जिंकून दिला.
पाकला नमवत दक्षिण आफ्रिका डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये; कगिसो रबाडा, मार्को जान्सेन यांच्या उपयुक्त खेळी
एक्स @ICC
Published on

सेंच्युरियन : कगिसो रबाडा आणि मार्को जान्सेन यांनी वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बासविरुद्ध शानदार फलंदाजी करत पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेला २ विकेटने जिंकून दिला. या विजयामुळे पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेने आपले स्थान निश्चित केले आहे.

दुसऱ्या डावात अब्बासच्या (५४ धावा देत ६ विकेट) शानदार गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ अडचणीत सापडला होता.

मात्र जान्सेन (नाबाद १६ धावा) आणि रबाडा (नाबाद ३१ धावा) हे दक्षिण आफ्रिकेसाठी संकटमोचक ठरले. या दुकलीने नाबाद फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दक्षिण आफ्रिकेने ८ फलंदाज गमावून १५० धावा जमवल्या.

अब्बासने चौथ्या दिवशी जेवणापूर्वी दक्षिण आफ्रिकेला संकटात टाकले होते. ९९ धावांवर ८ फलंदाज बाद अशी दक्षिण आफ्रिकेची अवस्था होती. मात्र रबाडाने जान्सेनसोबत उपयुक्त भागिदारी रचत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला.

गोलंदाजीतही मार्को जान्सेनने चमकदार कामगिरी केली. त्याने दुसऱ्या डावात १४ षटकांत ५२ धावा देत ६ विकेट मिळवले. कगिसो रबाडाने २ फलंदाजांना माघारी धाडले. पाकिस्तानचा दुसरा डाव २३७ धावांवर आटोपला.

तत्पूर्वी पहिल्या डावात यजमान दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर आयडेन मारक्राम (८९ धावा) आणि अष्टपैलू कॉर्बिन बॉश (नाबाद ८१ धावा) यांनी अप्रतिम फलंदाजी केली. तळात फलंदाजी करताना कॉर्बिन बॉशने झळकावलेले नाबाद अर्धशतक सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरले. त्यामुळे पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने ९० धावांची आघाडी घेतली होती. पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या २११ धावांवर संपुष्टात आला होता.

logo
marathi.freepressjournal.in