IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय; भारताचा कसोटी क्रिकेट इतिहासातला मोठा पराभव

South Africa Beat India in Test Series: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ४०८ धावांनी पराभव केला आणि मालिका २-० अशी जिंकली.
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय; भारताचा कसोटी क्रिकेट इतिहासातला मोठा पराभव
Published on

गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकाने भारतावर दणदणीत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने भारताचा ४०८ धावांनी मोठा पराभव केला आणि मालिका २-० अशी जिंकली. भारतासमोर ५४९ धावांचे लक्ष्य होते. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताला फक्त १४० धावा करता आल्या. यामुळे मालिकेत भारताचा २-० असा व्हाईटवॉश झाला. दक्षिण आफ्रिकेने तब्बल २५ वर्षानंतर भारतीय मैदानावर कसोटी मालिका जिंकली. तर, भारताला कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा पराभव पत्कारावा लागला. दक्षिण आफ्रिकेने कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात देखील भारताला ३० धावांनी पराभूत केले होते.

भारताचा लाजिरवाणा पराभव

गुवाहाटीतील दुसरा कसोटी सामना बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. दक्षिण आफ्रिकाने पहिल्या डावात ४८९ आणि दुसऱ्या डावात २६०/५ धावांवर डाव घोषित केला. भारतासमोर ५४९ धावांचे लक्ष्य होते. लक्ष्याचा पाठलाग करताना, भारताचा डाव ६३.५ षटकांत १४० धावांतच संपला.

यशस्वी जैस्वाल १३ धावांवर झेलबाद झाला आणि लोकेश राहुल सहा धावांवर बाद झाला. चौथ्या दिवशी, भारताने दुसऱ्या डावाची सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल १३ धावांवर स्वस्तात झेलबाद झाला. त्यानंतर काही वेळातच केएल राहुलला देखील सायमन हार्मरने ६ धावांवर बाद केले. पाचव्या दिवशी भारताने २७/२ धावांवर फलंदाजीला सुरूवात केली. कुलदीप यादवला सायमन हार्मरने ५ धावांवर बाद केले.

त्याच षटकात ध्रुव जुरेल देखील बाद झाला. त्यानंतर, भारतीय कर्णधार पंतने आक्रमकता दाखवत संघाची धावसंख्या ५८ पर्यंत नेली. पण, हार्मरने पंतला देखील १३ धावांवर पव्हेलियनचा रस्ता दाखवला. टी-ब्रेकनंतर साई सुदर्शनने १३९ चेंडूत १४ धावा करत संयमी खेळी खेळण्याचा प्रयत्न केला. तर, रवींद्र जडेजाने लढाऊ अर्धशतक ठोकले पण केशव महाराजने जडेजाला बाद केले. वॉशिंग्टन सुंदरने ४४ चेंडूत १६ धावा तर नितीश रेड्डी शून्यावर परतला. सायमन हार्मरने ३७ धावांत ६ विकेट्स घेतले.

दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय

सलामीवीर रायन रिकेल्टनला फिरकीपटू जडेजाने ३५ धावांवर बाद केले. रिकेल्टन आणि एडेन मार्करम यांनी पहिल्या विकेटसाठी ५९ धावा जोडल्या. त्यानंतर, जडेजाने एडेन मार्करमला देखील २९ धावांवर पव्हेलियनचा रस्ता दाखवला. वॉशिंग्टन सुंदरने टेम्बा बवुमाला ३ धावांवर बाद केले. स्टब्स आणि टोनी डी जोर्जी यांनी १०१ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने जोर्जीला ४९ धावांवर बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. स्टब्सने संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली, त्याने १८० चेंडूत ९४ धावा केल्या.

ट्रिस्टन स्टब्सच्या ९४ धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात २६० धावा केल्या. स्टब्स बाद झाल्यानंतर टेम्बा बवुमाने डाव घोषित केला. भारताकडून जडेजा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने ६२ धावांत चार विकेट्स घेतले.

भारताचा कसोटी क्रिकेट इतिहासातील मोठा पराभव

या सामन्यात, भारताला कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट आणि लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाने भारताचा ३४२ धावांनी पराभव केला होता. २१ वर्षात पहिल्यांदाच भारताला घरच्या मैदानावर चौथ्या डावात ५०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य देण्यात आले. याआधी, २०२४ मध्ये नागपूर कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ५४३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हा सामना ३४२ धावांनी गमावला होता.

भारताचे कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठे पराभव

  • दक्षिण आफ्रिका विरुद्ध,४०८ धावा २०२५

  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३४२ धावा, २००४

  • पाकिस्तान विरुद्ध ३४१ धावा , २००६

  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३३७ धावा, २००७

  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३३३ धावा, २०१७

  • दक्षिण आफ्रिका विरुद्ध ३२९ धावा, १९९६

logo
marathi.freepressjournal.in