पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेची आघाडी

विजयासाठी २१२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने १९.१ षटकांत तीन गडी बाद २१२ धावा केल्या
पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेची आघाडी

अरूण जेटली स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात गुरूवारी दक्षिण आफ्रिकेने भारतावर सात गडी राखून विजय मिळविला आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली. विजयासाठी २१२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने १९.१ षटकांत तीन गडी बाद २१२ धावा केल्या. रसी वॅन डर डुसेन (४६ चेंडूंत नाबाद ७५) आणि डेव्हिड मिलर (३१ चेंडूंत नाबाद ६४) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. या पराभवाबरोबरच सलग १३ टी-२० सामने जिंकण्याचा इतिहास घडविण्यापासून भारत वंचित राहिला.

इशान किशनचे बहारदार अर्धशतक व्यर्थ

भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षट्कांत ४ बाद २११ धावा केल्या. इशान किशनने बहारदार फलंदाजी करताना ४८ चेंडूंत ७६ धावा केल्या. त्याने तीन षट्कार आणि ११ चौकार यांची आतषबाजी केली. ॲनरिच नॉर्ट्जे, केशव महाराज, वेन पार्नेल, ड्वेन प्रिस्टोरियस यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

ऋतुराज गायकवाडने तीन षट्कार लगावून धडाकेबाज सुरूवात केलेली असतानाच सातव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. त्याने १५ चेंडूंत २३ धावा केल्या. श्रेयस अय्यरनेदेखील आक्रमक पवित्रा घेतला. सुरूवातीला अडखळत खेळणाऱ्या इशान किशनने नंतर जोरदार फटकेबाजी केली. इशानने ११ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर षटकार लगावत ३७ चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले. तेरावे षटक संपताना तो बाद झाला. ४८ चेंडूंत ७६ धावा करताना त्याने तीन षटकार आणि ११ चौकार लगावले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in