दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच अंतिम फेरीत

दक्षिण आफ्रिका महिला संघाने बुधवारी प्रथमच एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्यांनी गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडला १२५ धावांनी धूळ चारली. दीडशतक साकारणारी कर्णधार लॉरा वोल्वर्ड (१४३ चेंडूंत १६९ धावा) आणि अनुभवी अष्टपैलू मॅरीझेन काप (४२ धावा, ५ बळी) आफ्रिकेच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच अंतिम फेरीत
Photo : X (airnewsalerts)
Published on

गुवाहाटी : दक्षिण आफ्रिका महिला संघाने बुधवारी प्रथमच एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्यांनी गुवाहाटी येथे झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडला १२५ धावांनी धूळ चारली. दीडशतक साकारणारी कर्णधार लॉरा वोल्वर्ड (१४३ चेंडूंत १६९ धावा) आणि अनुभवी अष्टपैलू मॅरीझेन काप (४२ धावा, ५ बळी) आफ्रिकेच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने ५० षटकांत ७ बाद ३१९ धावांचा डोंगर उभारला. वोल्वर्ड व ताझ्मिन ब्रिट्स (४५) यांनी २२ षटकांत ११६ धावांची सलामी नोंदवली. त्यानंतर सोफी एक्केलस्टोनने ब्रिट्स, बोश (०) यांना बाद करून एकवेळ आफ्रिकेला ३ बाद ११९ असे अडचणीत आणले. मात्र वोल्वर्डने २० चौकार व ४ षटकारांसह एकदिवसीय कारकीर्दीतील १०वे शतक साकारले.

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ४२.३ षटकांत १९४ धावांत गारद झाला. कापने पहिल्याच षटकात हीदर नाइट व एमी जोन्सचा शून्यावर अडथळा दूर केला. त्यानंतर कर्णधार नॅट शीव्हर ब्रंट व एलिस काप्सी यांनी चौथ्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी रचली. मात्र कापने ब्रंटचा ६४ धावांवर, तर सून लूसने काप्सीचा ५० धावांवर अडथळा दूर केला. अखेरीस लिन्सी स्मिथने २७ धावांचा प्रतिकार केला. मात्र क्लर्कने तिलाच बाद करून आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

logo
marathi.freepressjournal.in