दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानला व्हाइटवॉश

के‌शव महाराज व कगिसो रबाडा यांनी दुसऱ्या डावात प्रत्येकी ३ बळी मिळवले. त्यानंतर डेव्हिड बेडिंघमने ३० चेंडूंत नाबाद ४७ धावा फटकावल्या.
दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानला व्हाइटवॉश
एक्स @Jay_Cricket12
Published on

केपटाऊन : के‌शव महाराज व कगिसो रबाडा यांनी दुसऱ्या डावात प्रत्येकी ३ बळी मिळवले. त्यानंतर डेव्हिड बेडिंघमने ३० चेंडूंत नाबाद ४७ धावा फटकावल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानला १० गडी राखून धूळ चारली. याबरोबरच आफ्रिकेने मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले.

या मालिकेतील पहिली कसोटी जिंकून आफ्रिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. आता जूनमध्ये त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ६१५ धावांचा डोंगर उभारल्यानंतर आफ्रिकेने पाकिस्तानला पहिल्या डावात १९४ धावांत गुंडाळले. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानवर फॉलोऑन लादला.

दुसऱ्या डावात मग कर्णधार शान मसूदच्या १४५ धावांच्या शतकी खेळीमुळे पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले. बाबर आझम (८१) व सलमान अघा (४८) यांनीही कडवी झुंज दिली. मात्र तरीही पाकिस्तानचा दुसरा डाव ४७८ धावांत आटोपला. त्यामुळे आफ्रिकेपुढे फक्त ५८ धावांचे लक्ष्य उभे ठाकले. बेडिंघमने ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४७, तर एडीन मार्करमने नाबाद १४ धावा करून ७.१ षटकांतच आफ्रिकेचा विजय साकारला. चौथ्या दिवशीच या लढतीचा निकाल लागला.

पहिल्या डावात द्विशतक साकारणारा रायन रिकेलटन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तर दोन सामन्यांत ८० धावा करण्यासह १० बळी मिळवणारा मार्को यान्सेनला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in