
लंडन : मिचेल स्टार्क टाकत असलेल्या ८४व्या षटकातील चौथ्या चेंडूवर कायले वेरानने कव्हर्सच्या दिशेने फटका लगावला आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसह लॉर्ड्स स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या तमाम चाहत्यांनी एकच जल्लोष केला. किंबहुना भारतातही असंख्य क्रीडाप्रेमींनी यावेळी टाळ्यांचा कडकडाट केला. अखेर शनिवारी आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणून टेम्बा बव्हुमाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या आफ्रकिने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून पराभव केला. याबरोबरच त्यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा २०२५चे विजेतेपद काबिज केले. त्यांना आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्या हस्ते मानाची गदा (टेस्ट मेस) प्रदान करण्यात आली.
क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स स्टेडियमवर रंगलेल्या या महाअंतिम सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाने दिलेले २८२ धावांचे लक्ष्य आफ्रिकेने शनिवारी चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात गाठून जगज्जेतेपद पटकावले. आफ्रिकेने ८३.४ षटकांत ५ फलंदाजांच्या मोबदल्यात २८२ धावा केल्या. यष्टीरक्षक वेरानने (नाबाद ४) विजयी धाव घेतली, तर डेव्हिड बेडिंघम दुसऱ्या बाजूला २१ धावांवर नाबाद राहिला. या दोघांसह लॉर्ड्सच्या बाल्कनीत कर्णधार बव्हुमा आणि अन्य सहकाऱ्यांनी केलेला जल्लोष डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. गेली अनेक वर्षांपासून लागलेला ‘चोकर्स’चा शिक्का (ऐनवेळी कच खाणारा संघ) आफ्रिकेने या जेतेपदासह पुसून काढत आपल्याला कमी न लेखण्याचा इशारा एकप्रकारे संपूर्ण विश्वाला दिला. आफ्रिकेचे हे एकंदर दुसरे आयसीसी जेतेपद ठरले. १९९८मध्ये त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचे (त्यावेळी नॉकआऊट ट्रॉफी) जेतेपद मिळवले होते. त्यानंतर बहुतांश आयसीसी स्पर्धांमध्ये त्यांना उपांत्य किंवा अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. यंदा मात्र बव्हुमाच्या शिलेदारांनी जगज्जेतेपद पटकावून दाखवले.
आयसीसीने २०१९पासून कसोटीमध्येही जागतिक पातळीवरील स्पर्धा सुरू केली. त्यापूर्वी वर्षाच्या अखेरीस जो संघ जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असायचा, त्याला मानाची गदा देण्यात यायची. मात्र २०१९पासून कसोटीतील जगज्जेतेपदासाठी सुरू केलेल्या या संग्रामास चाहत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. दोन वर्षांच्या कालावधीसाठी ही स्पर्धा खेळवण्यात येते. यामध्ये प्रत्येक संघ घरच्या मैदानात ३, तर परदेशात ३ कसोटी मालिका खेळतो. साखळी फेरीच्या अखेरीस टक्केवारीनुसार गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानी असलेले संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. २०१९-२०२१ या कालावधीत भारत-न्यूझीलंड संघाने अंतिम फेरी गाठली होती. न्यूझीलंडने भारताला अंतिम फेरीत धूळ चारून पहिला जागतिक कसोटी विजेता ठरण्याचा मान मिळवला. त्यानंतर २०२१-२०२३ या कालावधीतही भारताने अंतिम फेरी धडक मारली. मात्र यावेळीही त्यांच्या पदरी निराशा पडली, कारण ऑस्ट्रेलियाने त्यांना अंतिम सामन्यात नेस्तनाबूत केले. यंदा ऑस्ट्रेलियाकडे सलग दुसऱ्यांदा कसोटीतील जगज्जेता बनण्याची संधी होती. मात्र प्रथमच अंतिम फेरीत धडक मारलेल्या आफ्रिकेने त्यांचे मनसुबे उधळून लावले.
उभय संघांतील या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ २१२ धावांत गारद झाला. कगिसो रबाडाने ५ बळी मिळवले. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनाही जोरदार प्रत्युत्तर देत आफ्रिकेला १३८ धावांत गुंडाळले. त्यामध्ये कर्णधार कमिन्सच्या सहा बळींचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे कांगारूंना ७४ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात मग रबाडा आणि लुंगी एन्गिडीने ऑस्ट्रेलियाची त्रेधातिरपीट उडवताना त्यांची ७ बाद ७३ अशी स्थिती केली होती. मात्र स्टार्कचे अर्धशतक व कॅरीच्या झुंजार खेळीमुळे कांगारूंनी २०७ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे आफ्रिकेपुढे २८२ धावांचे लक्ष्य उभे ठाकले.
कमिन्स, जोश हेझलवूड व स्टार्क अशा वेगवान त्रिकुटाविरुद्ध हे लक्ष्य सोपे नव्हते. तसेच खेळपट्टीही गोलंदाजांना पोषक होती. मात्र आफ्रिकेने सकारात्मक सुरुवात करताना धावा काढणे कायम राखले. विशेषत: मार्करमने कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारताना कसोटीतील आठवे शतक झळकावले. त्याला कर्णधार बव्हुमाच्या २५व्या अर्धशतकाची सुरेख साथ लाभली. या दोघांनी तिसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेला २ बाद २१३ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यामुळे चौथ्या दिवशी आफ्रिकेला विजयासाठी ६९ धावांची, तर ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सची गरज होती.
चौथ्या दिवशी तिसऱ्याच षटकात कमिन्सने बव्हुमाचा अडसर दूर करून सामन्यात रंगत निर्माण केली. १३४ चेंडूंत ५ चौकारांसह ६६ धावा करणाऱ्या बव्हुमाने मार्करमसह तिसऱ्या विकेटसाठी १४७ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स (८) छाप पाडू शकला नाही. त्याचा स्टार्कनेच त्रिफळा उडवला. स्टब्स व मार्करमने काहीशी संथगतीने (१२ षटकांत २४ धावा) फलंदाजी केल्यामुळे काही वेळेस ऑस्ट्रेलिया पुनरागमन करणार का, असे वाटू लागले.
मात्र बेडिंघमने मार्करमच्या साथीने संघाला विजयासमीप नेले. मार्करम संघाला विजय मिळवूनच परतणार, असे वाटत असताना हेझलवूडच्या गोलंदाजीवर ट्रेव्हिस हेडने त्याचा अप्रतिम झेल टिपला. मार्करमने २०७ चेंडू किल्ला लढवताना १४ चौकारांसह १३६ धावांची संस्मरणीय खेळी साकारली. त्यानंतर वेरानही बाद झाला असता, मात्र ऑस्ट्रेलियाचे सर्व रिव्ह्यू त्यावेळी संपले होते. अखेरीस वेरान आणि बेडिंघम जोडीनेच उर्वरित ६ धावा संयमीपणे काढून ८४व्या षटकात आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय साकारला. १३६ धावांची खेळी साकारणाऱ्यासह पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथचा मोलाचा बळी मिळवणाऱ्या मार्करमला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : २१२
द. आफ्रिका (पहिला डाव) : १३८
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : २०७
द. आफ्रिका (दुसरा डाव) : ८३.४ षटकांत ५ बाद २८२ (एडीन मार्करम १३६, टेम्बा बव्हुमा ६६, वियान मल्डर २७, डेव्हिड बेडिंघम नाबाद २१; मिचेल स्टार्क ३/६६)
सामनावीर: एडीन मार्करम (१३६ धावा, २ बळी)
हेझलवूड संघाचा भाग असताना ऑस्ट्रेलियाने आजवर लॉर्ड्सवर एकही कसोटी गमावलेली नव्हती. तसेच तो आजवर एकाही आंतरराष्ट्रीय किंवा फ्रँचायझी स्पर्धेचा अंतिम सामना हरला नव्हता. मात्र हा विक्रम यावेळी मोडीत निघाला.
हेझलवूड, कमिन्स आणि स्टार्क हे वेगवान त्रिकुट संघात असताना ऑस्ट्रेलियाने आजवर एकाही आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना गमावलेला नव्हता. या तिघांनी एकदिवसीय विश्वचषक २०१५, २०२३, टी-२० विश्वचषक २०२१ व जागतिक कसोटी अजिंक्यपद (२०२३) अशा आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने एकत्रित जिंकले होते.
२०२५ हे वर्ष नवविजेत्यांचे
२०२५ या वर्षात अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये नवा विजेता उदयास आला आहे. फुटबॉलच्या चॅम्पियन्स लीगमध्ये पॅरिस सेंट जर्मेनने जेतेपद मिळवले. आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या बंगळुरूने १७ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणून प्रथमच ट्रॉफी उंचावली. बिग बॅश लीगमध्ये होबार्टने १३ वर्षांत प्रथमच विजेतेपद मिळवले. टाटॅनेहॅमने ४१ वर्षांत प्रथमच युरोपा लीग जिंकली.
२७ - आफ्रिकेने २७ वर्षांनी एखादी आयसीसी स्पर्धा जिंकली. यापूर्वी १९९८मध्ये त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचे (त्यावेळी नॉकआऊट ट्रॉफी) जेतेपद मिळवले होते. त्यामुळे त्यांचे हे एकंदर दुसरे आयसीसी जेतेपद ठरले. दोन जेतेपदांमध्ये तब्बल ९,७२२ दिवसांचा अवधी होता.
९ - बाव्हुमाच्या नेतृत्वात आफ्रिकेने अद्याप एकही कसोटी गमावलेली नाही. बाव्हुमाने १० पैकी ९ कसोटींमध्ये संघाचे यशस्वी नेतृत्व केले, तर १ लढत अनिर्णित राहिली आहे.
३ - गेल्या तिन्ही वेळेस डब्ल्यूटीसीमध्ये नवा विजेता उदयास आला आहे. २०२१मध्ये न्यूझीलंड, २०२३मध्ये ऑस्ट्रेलिया, तर यंदा २०२५मध्ये आफ्रिकेने बाजी मारली. भारताला २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला.
कारकीर्दीतील ही सर्वाधिक मौल्यवान खेळी होती. लॉर्ड्सवर संघासाठी ऐतिहासिक विजय मिळवणे स्वप्नवत आहे. २८२ धावांचे लक्ष्य जेव्हा आमच्यासमोर आले, तेव्हा संघातील प्रत्येक खेळाडूला विश्वास होता की आपण हे साध्य करू शकतो. आमच्या गोलंदाजांनी आम्हाला सामन्यात पुनरागमन करून दिले. गेल्या २ वर्षांच्या मेहनतीचे हे फळ आहे. - एडीन मार्करम, सामनावीर
द. आफ्रिकेला ‘या’ आयसीसी स्पर्धांमध्ये आले अपयश
उपांत्य फेरीत पराभूत : १९९२, १९९९, २००७, २०१५, २०२३चा एकदिवसीय विश्वचषक, २००९, २०१४ टी-२० विश्वचषक. २०००, २००२, २००६, २०१३, २०२५ची चॅम्पियन्स ट्रॉफी.
अंतिम फेरीत पराभूत : २०२४ टी-२० विश्वचषक.
गेले चार दिवस मला आयुष्यभर स्मरणात राहतील. आम्ही एकप्रकारे आफ्रिकेतच खेळत आहोत, असे वाटले. चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. या संघातील प्रत्येक खेळाडूवर मला विश्वास होता. रबाडा, मार्करम यांची कामगिरी खास होती. संपूर्ण देशाला जल्लोष करण्याची संधी दिल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. गेली अनेक वर्षे आम्ही या क्षणाची प्रतीक्षा केली आहे.
- टेम्बा बव्हुमा, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार