धिस टाइम फॉर आफ्रिका!

उम्मीद पे दुनिया कायम हैं... असे म्हणतात. याच उम्मीदवर गेल्या २७ वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ मैदानात उतरत होता. कधी हाता तोंडाशी आलेला, तर कधी घशात उतरलेला घास हिरावला गेला. बॅटरीतल्या ॲनोड अन कॅथोडसारखे यश आणि त्यांची कायमच दोन बाजूंना दोन तोंडे राहीली. यशाचा प्रवाह जरूर प्रवेश करायचा; पण विजयाचा दिवा मात्र पेटायचा नाही.
धिस टाइम फॉर आफ्रिका!
Photo - ICC
Published on

रोहित गुरव

उम्मीद पे दुनिया कायम हैं... असे म्हणतात. याच उम्मीदवर गेल्या २७ वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ मैदानात उतरत होता. कधी हाता तोंडाशी आलेला, तर कधी घशात उतरलेला घास हिरावला गेला. बॅटरीतल्या ॲनोड अन कॅथोडसारखे यश आणि त्यांची कायमच दोन बाजूंना दोन तोंडे राहीली. यशाचा प्रवाह जरूर प्रवेश करायचा; पण विजयाचा दिवा मात्र पेटायचा नाही. शनिवारच्या पहाटे नियती टेम्बा बव्हुमाच्या कानात ‘विजय विजय’ असे जोराने किंचाळली. त्यालाही त्यावर विश्वास बसत नव्हता, त्याला ते दिवा स्वप्न वाटत होते. मनोमनी तो पुटपुटला अन् त्याने स्वत:ला चिमटा काढून पाहिला. लॉर्ड्सवर सूर्य देव डोक्यावर यायच्या आधीच शनी देव प्रसन्न झाला. योगही शनिवारचाच होता. त्यांच्या पाठची इडा पिडा त्या देवाने नाहीशी केली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२५च्या विजेतेपदाची गदा उंचावत चोकर्सने क्रिकेट जगताला शोकर्स (धक्का) दिला होता.

नजर उतरवण्यासारखा हा अंतिम कसोटी सामना झाला. खेळपट्टीची अवस्था कांचन मृगाच्या मोहात पडलेल्या सीतेसारखी झाली होती. ती वेगवान गोलंदाजांच्या प्रेमात वेडीपिशी झाली होती. वेगाला ती पुरती भुलली होती. मेकअप केलेल्या नटीच्या चेहऱ्यासारखी खेळपट्टी टॅन झालेली दिसत होती. तिच्यावर इंग्लिश सौंदर्य, स्वभावाचा साज अन् प्रभाव चढला होता. अशी नखशिखांत सुंदरी वेगवान गोलंदाजांवर भाळलेली असताना त्याला के‌वळ अचूक टप्प्यावर चेंडू फेकायचा होता, पुढचे काम करायला खेळपट्टी सज्ज होती. अपेक्षेप्रमाणे तसेच झाले. पहिल्या दिवशी रबाडाने धडकी भरवली. तो आग ओकत होता. गुड लेंथ त्याचे टार्गेट होते. मध्येच उसळी, इन आणि आऊट स्विंग टाकून त्याने कांगारूंना गांगरवले. ख्वाजा, स्मिथ, लाबूशेन, हेड, ग्रीन या भल्याभल्या फलंदाजांनी त्याच्यापुढे नांगी टाकली. रबाडाचा सामना करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांची अवस्था ‘त्राही मम त्राही मम’ (वाचवा वाचवा) अशी झाली. पहिला दिवस फलंदाजांसाठी वनवास ठरला. तब्बल १४ फलंदाज या एका दिवशी बाद झाले.

दुसऱ्या दिवशी पॅट कमिन्स गब्बर झाला. ‘कितने आदमी थे’ म्हणत त्याने ६ फलंदाज आपल्या सापळ्यात अडकवले. भाजीतून कडीपत्ता बाजूला करावा ना तसे तो एकेका फलंदाजाला माघारी धाडत होता. स्टम्प म्हणजे त्याच्यासाठी पक्ष्याचा डोळा होता. मग तो अर्जुन झाला आणि त्याने स्टम्प्सवरच मारा केला. फलंदाजाला बॅकफूटवर सरकवल्यावर तो त्याचे मनसुबे साध्य करत होता. कमिन्स हा प्रचंड हुशार गोलंदाज आहे. तो फलंदाजाच्या डोक्याशी खेळतो. त्याचा स्लोवर बाऊंसर पण अफलातून आहे. मेलेल्या खेळपट्ट्यांवर तो त्याचा वापर हमखास करतो. त्याला कुठच्या खेळपट्टीवर काय करायला हवे याची पुरती जाण आहे.

निर्णायक डावात एडीन मार्करम आणि टेम्बा बव्हुमा हे कोहिनूर हिरो ठरले. फलंदाजी पर्यायी ठरलेल्या खेळपट्टीवर त्यांनी दादागिरी केली. मार्करमने फलंदाजीची स्टेअरिंग आपल्या हाती घेतली. त्याच्या खेळीने गरजेनुसार गिअर बदलला. सुरुवातीला त्याच्या खेळीने ‘संयम संयम’ म्हणून जप केला. अधूनमधून फटक्यांचे सौंदर्य दाखवले. ती फक्त फटक्यांना भुकेली नव्हती. तिला विजयाची भूक होती. डोक्यावर बर्फ ठेवून मार्करमने फटक्यांची निवड केली. १३६ धावा करताना त्याने एकही षटकार मारला नाही. समुद्रातून निवडक मासे वेचावेत ना तसे त्याने मोठे फटके निवडले होते. त्याउलट पाने खुडावीत ना तशी त्याने पोतीभर एकेरी, दुहेरी धावा जमवल्या. मार्करमच्या संयमाला कशाचीच तोड नव्हती. ‘बॉर्डर’मधल्या सनी देओलसारखा तो ऑस्ट्रेलियाच्या विजयाआड कठोरपणे उभा होता. फलंदाज जिथे लोटांगण घालत होते तिथे मार्करम वर्गातल्या धतिंग मुलाप्रमाणे कॉलरवर करून चालत होता. मार्करम हिरो होत असताना कर्णधार बव्हुमा त्याचा सारथी झाला. त्याला साथ देता देता बव्हुमाने स्वत:लाही सिद्ध केले. मिचेल स्टार्क हा बिबट्यासारखा झडप घालतो. त्याला या दुकलीने वेगवान धावणाऱ्या हरणाप्रमाणे चकवले. १३६ आणि ६६ हे केवळ आकडे नव्हते; हा दक्षिण आफ्रिकेच्या महत्त्वाकांक्षेचा जुनून होता.

वाऱ्याचा वेग असतो तिथे स्टार्क, कमिन्स, हेझलवूड बाहुबली होतात. त्यांनी अंगावर येणारे, उसळी घेणारे चेंडू, स्विंग असे नानाविध डावपेच आखले. मात्र ते निरर्थक ठरले. मार्करम-बव्हुमा जोडीने मान खाली घालून (बचावात्मक फलंदाजी) केलेल्या फलंदाजीने त्यांच्या चाकातील हवाच काढून टाकली. या जोडीची फलंदाजी पाहताना मधुबाला, माधुरी जरी आल्या असत्या ना तर त्यांना एखाद्या चाहत्याने थांबण्याचा इशारा केला असता. तो म्हणाला असता की जरा थांबा आधी मला मार्करम आणि बव्हुमाच्या फलंदाजीतील सौंदर्य न्याहाळू दे. इतकी त्यांच्या खेळीत संयमी नशा होती. इंग्लिश महिला आणि तिथले हवामान कायमच बेभरवशाचे असते. तिसऱ्या दिवशी सरड्यापेक्षा वेगाने हवामानाने रंग बदलला. खेळपट्टीचे वेगवान गोलंदाजांवरचे प्रेमही एकाएकी बदलले. त्याचा काही अंशी लाभ दक्षिण आफ्रिकेने उचलला.

१९९२, १९९९, २००३, २०१५, २०२३, २०२४ या वर्षांतील एकदिवसीय तसेच टी-२० विश्वचषकात नियती आफ्रिकेवर रुसली होती. कधी पाऊस तर कधी मोक्याच्या क्षणी कच असे काही ना काही त्यांच्या यशाला ब्रेक लावत होते. मात्र हा संघ थांबला नाही; तो अधिक जोमाने कामाला लागला. म्हणतात ना कोशिश करने वालों की कभी हार नही होती. हा विजय त्यांच्या या २७ वर्षांच्या तपस्येचा भाग आहे. त्यात जाँटी रोड्स, ॲलन डोनाल्ड, हेन्सी क्रोनिये, शॉन पोलॉक, ग्रॅमी स्मिथ, ए बी डीव्हिलियर्स या महारथींनी रचलेल्या भक्कम पायाची जोड आहे. बव्हुमाने त्या टेम्बाला (होप) वास्तवात परिवर्तीत केले. म्हणूनच ‘आईये मेहरबा’ म्हणत जेतेपदाची माळ दक्षिण आफ्रिकेच्या गळ्यात गेली. अखेर आफ्रिकेने क्रिकेटची लोकसभा जिंकलीच.

logo
marathi.freepressjournal.in