

अर्लिंग्टन : तारांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विश्वचषक विजयाचे स्वप्न मंगळवारी पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाले. मिकेल मेरिनोने भरपाई वेळेत केलेल्या एकमेव निर्णायक गोलच्या बळावर स्पेनने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रोनाल्डोच्या पोर्तुगालचा १-० असा पराभव केला. याबरोबरच त्यांनी १६ वर्षांनी विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर पराभवामुळे पोर्तुगालचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीतच गारद झाला. ४१ वर्षीय रोनाल्डोची विश्वचषक कारकीर्द या पराभवासह संपुष्टात आल्याने त्याला भावना आवरणे कठीण गेले.
डल्लास स्टेडियमवर ७० हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या लढतीत दोन्ही संघांत गोल करण्यासाठी कडवा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र २०१०च्या विजेत्या स्पेनसाठी बदली खेळाडू म्हणून आलेल्या ३० वर्षीय मेरिनोने ९०+१ मिनिटाला अप्रतिम गोल झळकावला आणि संघाच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. मेरिनोला ८५व्या मिनिटालाच डॅनी ओल्मोच्या जागी मैदानात पाठवण्यात आले आणि त्याने ५ मिनिटांच्या अवधीनंतर संघासाठी निर्णायक गोल नोंदवला. बदली खेळाडू म्हणूनच आलेल्या फेरान टोरेसचे गोलसहाय्य (असिस्ट) यामध्ये मोलाचे ठरले. आता स्पेनसमोर शनिवार, ११ जुलै रोजी होणाऱ्या उपांत्यपूर्व लढतीत बेल्जियमचे आव्हान असेल.
एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य स्थिती कायम असतानाच फिफा विश्वचषकाचा महासंग्राम जागतिक महासत्तेसह मेक्सिको व कॅनडाच्या रणभूमीवर सुरू आहे. १२ जून ते २० जुलै या कालावधीत (भारतीय वेळ आणि तारखांनुसार) अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तपणे फिफा विश्वचषकाच्या २३व्या पर्वाचा थरार रंगत आहे. यंदा प्रथमच तीन देश संयुक्तपणे विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून पहिल्यांदाच ४८ संघही सहभागी झाले होते. आता विश्वचषकाचा थरार उपउपांत्यपूर्व फेरीच्या टप्प्यावर असून प्रत्येकी लढतीनंतर रोमांच वाढत आहे. फ्रान्स, मोरोक्को, नॉर्वे, इंग्लंड, स्पेन व बेल्जियम या सहा संघांनी आतापर्यंत उपांत्यपूर्व फेरी गाठली असून उर्वरित दोन लढतींमधून (अर्जेंटिना वि. इजिप्त, कोलंबिया वि. स्वित्झर्लंड) कोण आगेकूच करणार, हे पाहणे रंजक ठरेल.
गेल्या विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या पोर्तुगालला यंदा सुरुवातीपासूनच संघर्ष करावा लागला होता. साखळी फेरीत उझबेकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर त्यांना काँगो व कोलंबिया संघाविरुद्ध बरोबरीत समाधान मानावे लागले. मग राऊंड ऑफ ३२ लढतीत क्रोएशियाविरुद्ध गोंझालो रामोसने केलेल्या गोलमुळे त्यांनी २-१ अशी सरशी साधली. मंगळवारी स्पेनपुढे मात्र त्यांचे आक्रमण फिके पडले. स्पेनचा गोलरक्षक उनाई सिमोनचा बचाव पोर्तुगालला भेदता आला नाही. यंदाच्या विश्वचषकातील सलग पाच सामन्यांत स्पेनने प्रतिस्पर्धी संघाला गोल करू दिलेला नाही.
उभय संघांतील पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत पार पडले. ३७व्या मिनिटाला होआओ फेलिक्सचा हेडर सिमॉनच्या डाव्या खांद्याला लागून हवेत उडाला असता रोनाल्डोने उजव्या पायाने मारलेला शॉट सिमॉनने हवेत उडी मारून पकडला, जी पोर्तुगालसाठी सर्वोत्तम संधी होती. तसेच स्पेनच्या लॅमिन यमाल, ओयारझबाल यांचे हल्लेदेखील पोर्तुगालचा गोलरक्षक दिएगो कॉस्टा यशस्वीपणे थोपवत होता. दुसऱ्या सत्रात मात्र स्पेनने आक्रमणात धार आणली. २-३ बदली खेळाडू त्यांनी मैदानात धाडले. त्यांपैकीच एक असलेल्या मेरिनोला ९०व्या मिनिटाला मैदानात पाडल्यानंतर फाउल घोषित करण्यात आला होता. पोर्तुगालचा बर्नार्डो सिल्वा पंचांशी वाद घालत असताना मेरिनोने चपळाईने चेंडू पुन्हा खेळात आणला आणि टोरेसच्या पासवर कोस्टाला चकवून शिताफीने गोल केला.
शेवटच्या ८ मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत पोर्तुगालने बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले, ज्यात सिल्वाचा हेडर गोलपोस्टच्या वरून गेला. तसेच भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटातही फ्री-किकवर पोर्तुगालला गोल करण्याची संधी होती, मात्र ब्रुनो फर्नांडीसला त्याचा लाभ उचलता आला नाही.
सिमॉनने विश्वचषकात सलग ६०९ मिनिटे एकही गोल न स्वीकारण्याचा स्वतःचा विक्रम अबाधित राखला असून स्पेन विश्वचषकात सलग ६ सामने क्लीन शीट राखणारा पहिला संघ ठरला आहे. त्यांनी २०२२मध्ये मोरोक्कोला निर्धारित वेळेत बरोबरीत रोखले होते. त्यानंतर २०२६च्या विश्वचषकातील पाच सामन्यांचा यामध्ये समावेश आहे.
गोलफलक
स्पेन (१) - पोर्तुगाल (०)
मेरिनो (९०+१)
पराभवास कारण की...
पोर्तुगालच्या विश्वचषकातील सुमार कामगिरीमागे अनेक कारणे आहेत. त्यांपैकी एक म्हणजे संघातील काही खेळाडूंमध्ये असलेले मतभेद. यामध्ये ब्रुनो फर्नांडीस व रोनाल्डो यांची नावे चर्चेत आहेत.
पोर्तुगालच्या संघात आक्रमकतेचा अभाव आढळतो. अनेकदा आघाडीवर असतानाही हा संघ बचावात्मक खेळ करतो. तसेच संघातील बहुतांश कौशल्यवान खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळत नाही.
क्रोएशियाविरुद्ध विजयी गोल करणाऱ्या रामोसला यावेळी बदली खेळाडू म्हणूनही संधी दिली नाही, तर अनुभवी बर्नार्डो सिल्व्हाला उशिराने मैदानात पाठवण्यात आले.
रोनाल्डोचे वाढते वय, सध्याचा फॉर्म व त्यामुळे अन्य खेळाडूंवर येणाऱ्या मर्यादा, दडपण या बाबींचाही पोर्तुगालला नक्कीच फटका बसला.
सहा विश्वचषक, ११ गोल, पदरी मात्र निराशाच
क्लबस्तरीय पातळीवर एकेकाळी रेयाल माद्रिदकडून लक्षणीय यश मिळवणाऱ्या रोनाल्डोला विश्वचषकात पोर्तुगालसाठी तशी कामगिरी करणे जमले नाही. पोर्तुगालने २०१६मध्ये युरो चषक व २०१९, २०२५मध्ये नेशन्स लीगचे विजेतेपद पटकावले, तेव्हा रोनाल्डो नक्कीच या विजयात मोलाचा घटक होता. याच स्पर्धा त्याच्या कारकीर्दीतील ३ आंतरराष्ट्रीय जेतेपद ठरले. मात्र विश्वचषकात त्याच्या पदरी निराशा पडली. रोनाल्डो खेळलेल्या सहा विश्वचषकांपैकी फक्त एकदाच पोर्तुगालला उपांत्य फेरी गाठता आली. २००६मध्ये त्यांनी चौथे स्थान मिळवले होते.
वयाच्या २१व्या वर्षी रोनाल्डोने २००६मध्ये विश्वचषकातील पहिला सामना खेळला. २००६, २०१०, २०१४, २०१८, २०२२, २०२६ अशा सहा विश्वचषकांत किमान एक गोल करणारा रोनाल्डो एकमेव खेळाडू आहे. मात्र या सहा विश्वचषकांत रोनाल्डोला एकूण २७ सामन्यांत फक्त ११ गोल नोंदवता आले. यंदाच्या विश्वचषकात त्याने ३ गोल नोंदवले. तर २०१८च्या विश्वचषकात रोनाल्डोने ४ गोल झळकावले होते. अन्य चार विश्वचषकांत त्याने प्रत्येकी एक गोल केला.
पराभवानंतर मैदानातून बाहेर पडताना रोनाल्डोच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. त्याने चाहत्यांना हात उंचावून प्रतिसाद दिला. बराच काळ तो मैदानात कंबरेवर हात ठेवून उभा होता. रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत २३३ सामन्यांत १४६ गोल नोंदवले. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत तो अग्रस्थानी आहे. तसेच पोर्तुगालसाठी विश्वचषकात सर्वाधिक गोलही त्याच्याच नावे आहेत.
या महत्त्वाच्या सामन्याच्या एक दिवस आधी रोनाल्डोने पत्रकारांशी सुमारे २५ मिनिटे संवाद साधला होता. हा आपला शेवटचा सामना ठरू नये अशी आशा त्याने व्यक्त केली होती, तसेच आपल्या या अंतिम विश्वचषकाचा पूर्ण आनंद घेण्याची इच्छाही त्याने बोलून दाखवली होती. रोनाल्डोने तूर्तास निवृत्ती जाहीर केलेली नसली, तरी विश्वचषकातील त्याचा प्रवास संपुष्टात आल्याने जगभरातील त्याच्या असंख्य चाहत्यांचाही हिरमोड झाला.
प्रशिक्षकांचा राजीनामा; रामोस मैदानाबाहेरच
पोर्तुगालचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येताच प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच गोंझालो रामोसला संधी नाकारण्यात आल्याने त्यांच्यावर चाहत्यांकडून टीकाही करण्यात येत आहे.
२०१०च्या विश्वचषकात स्पेनने पोर्तुगालचा बाद फेरीत १-० असा पराभव केला होता, तर २०१८मध्ये उभय संघांतील लढत ३-३ अशी बरोबरीत सुटली होती. विश्वचषकात गेल्या १६ वर्षांत तिन्ही सामन्यांत स्पेन पोर्तुगालविरुद्ध अपराजित आहे. यावरूनच त्यांचे पोर्तुगालवरील वर्चस्व अधोरेखित होते.