FIFA World Cup 2026 : स्पेनकडून फ्रान्सला पेन! २-० अशा विजयासह विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक; एम्बाप्पेची निराशा

किलियान एम्बाप्पेसह फ्रान्सच्या जगभरातील चाहत्यांचा मंगळवारी मध्यरात्री स्वप्नभंग झाला. स्पेनच्या भक्कम बचावापुढे फ्रान्सचे आक्रमण पूर्णपणे निष्प्रभ ठरले. त्यामुळे स्पेनने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य सामन्यात फ्रान्सला २-० अशी धूळ चारून तब्बल १६ वर्षांनी अंतिम फेरीत धडक मारली. फ्रान्सचे मात्र सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.
FIFA World Cup 2026 : स्पेनकडून फ्रान्सला पेन! २-० अशा विजयासह विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक; एम्बाप्पेची निराशा
FIFA World Cup 2026 : स्पेनकडून फ्रान्सला पेन! २-० अशा विजयासह विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक; एम्बाप्पेची निराशा
Published on

अर्लिंग्टन : किलियान एम्बाप्पेसह फ्रान्सच्या जगभरातील चाहत्यांचा मंगळवारी मध्यरात्री स्वप्नभंग झाला. स्पेनच्या भक्कम बचावापुढे फ्रान्सचे आक्रमण पूर्णपणे निष्प्रभ ठरले. त्यामुळे स्पेनने फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील उपांत्य सामन्यात फ्रान्सला २-० अशी धूळ चारून तब्बल १६ वर्षांनी अंतिम फेरीत धडक मारली. फ्रान्सचे मात्र सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. त्यामुळे स्पेनने एकप्रकारे फ्रान्सला पेन (वेदना) दिल्याची चर्चा आहे.

डल्लास स्टेडियम, अर्लिंग्टन येथे झालेल्या उभय संघांतील या लढतीकडे जणू अंतिम फेरीप्रमाणेच पाहिले जात होते. एकीकडे स्पर्धेत ६ सामन्यांत १६ गोल करणारे फ्रान्सचे आक्रमक विरुद्ध ६ सामन्यांत फक्त एकच गोल स्वीकारणारे स्पेनचे बचावपटू यांच्यातील जुगलबंदीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र स्पेनच्या नियंत्रणापुढे फ्रान्सचे आक्रमण फिके पडले. उलट स्पेनने आक्रमण करून मिकेल ओयारझबाल व पेद्रो पोरो यांनी नोंदवलेल्या दोन गोलच्या बळावर बाजी मारली. आता रविवारी मध्यरात्री रंगणाऱ्या महाअंतिम मुकाबल्यात स्पेनसमोर अर्जेंटिना किंवा इंग्लंडचे आव्हान असेल.

फिफा विश्वचषकाचा थरार गेल्या महिनाभरापासून सुरू असून आता ही स्पर्धा उपांत्य फेरीच्या टप्प्यावर आहे. फ्रान्स, मोरोक्को, स्पेन, बेल्जियम, इंग्लंड, नॉर्वे, अर्जेंटिना व स्वित्झर्लंड या आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. मात्र त्यांपैकी फ्रान्स, स्पेन, इंग्लंड व अर्जेंटिना यांनी आगेकूच केली, तर अन्य चार संघांची वाटचाल संपुष्टात आली. आता फ्रान्सच्या पराभवामुळे काही चाहत्यांना धक्का बसला आहे, तर अनेकांनी स्पेन अंतिम फेरीचा खरा हकदार असल्याचे मत व्यक्त केले आहे. आता अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड यांच्यातील उपांत्य लढतीत कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.

दरम्यान, २७ वर्षीय एम्बाप्पेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या फ्रान्सने यंदाच्या विश्वचषकात साखळीत इराक, सेनेगल, नॉर्वे यांना धूळ चारली, तर राऊंड ऑफ ३२ लढतीत स्वीडनला नमवले. मग उपांत्यपूर्व सामन्यात मोरोक्कोला २-० असे नमवून फ्रान्सने सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती. १९९८ व २०१८च्या विजेत्या फ्रान्सला २०२२मध्ये अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. फ्रान्स हा सलग तीन विश्वचषकांत किमान उपांत्य फेरी गाठणारा तिसरा देश ठरला होता. यापूर्वी ब्राझील व जर्मनी यांनी अशी कामगिरी केली आहे. तसेच फ्रान्सने एकंदर आठव्यांदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती.

दुसरीकडे रॉड्रीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या स्पेनने यंदा साखळी फेरीत ह-गटातून अग्रस्थानासह आगेकूच करताना सौदी अरेबिया व उरुग्वे यांना धूळ चारली, तर केप व्हर्डेविरुद्ध बरोबरी पत्करली. त्यानंतर बाद फेरीत (राऊंड ऑफ ३२) स्पेनने ऑस्ट्रियाला ३-० असे नेस्तनाबूत केले, तर उपउपांत्यपूर्व लढतीत रोनाल्डोच्या पोर्तुगालचा स्वप्नभंग करताना १-० असा विजय मिळवला. या पाचही लढतीत स्पेनने एकही गोल स्वीकारलेला नव्हता. उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमविरुद्ध त्यांनी २-१ असा विजय मिळवला. त्यामुळे त्यांची गोल न स्वीकारण्याची मालिका खंडीत झाली. स्पेनने २०१०नंतर प्रथमच उपांत्य फेरी गाठली होती. त्यावेळी त्यांनी विश्वचषक उंचावला होता.

उभय संघातील या लढतीत स्पेनने सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. फ्रान्सने स्पेनची भीती बाळगावी हा तरुण खेळाडू लॅमिन यमालचा दावा खरा ठरला. फिफा क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या फ्रान्सकडे उपांत्य फेरीपूर्वी २० विश्वचषक सामन्यांमध्ये २० गोल करणारा कर्णधार एम्बाप्पे, बॅलन डी’ओर विजेता ओस्मान डेम्बेले आणि स्पर्धेत सर्वाधिक ५ असिस्ट करणारा मायकेल ओलीस असे दिग्गज खेळाडू होते. फ्रान्सचे खेळाडू जगातील सर्वोत्तम संघाचा सामना करत होते, असे स्पेनचे प्रशिक्षक लुईस दे ला फुएन्ते यांनी आपल्या खेळाडूंबद्दल सांगितले.

यमालच्या हुशारीमुळे मिळालेल्या पेनल्टीवर मिकेल ओयारझाबाल याने गोल केला, तर पेद्रो पोरो याने दुसरा गोल करत स्पेनला दुसऱ्यांदा अंतिम फेरीच पोहोचवले. पेद्रो पोरोने डॅनी ओल्मोसोबत पासची देवाणघेवाण करत ५८व्या मिनिटाला स्पेनला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर लगेचच १९ वर्षांच्या यमालचा एक गोल ऑफसाईडमुळे नाकारण्यात आला. परंतु यमालने एका अनुभवी बचावपटूविरुद्ध दाखवलेल्या चपळाईमुळेच स्पेनला सुरुवातीलाच पेनल्टी मिळाली होती. मिकेल ओयारझाबालचा या विश्वचषकातील हा ५ वा गोल ठरला, तर स्पेनसाठी ६० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील त्याचा हा ३०वा गोल होता.

या स्पर्धेतील ७ सामन्यांमध्ये दोन्हीपैकी कोणत्याही संघावर पिछाडीवर पडण्याची ही पहिलीच वेळ होती. दुसऱ्या गोलसाठी पोरोने डिफेंडर डॅयोट उपामेकानोकडून ओल्मोला पाडण्यापूर्वी मिळालेल्या पासवर सुंदर गोल केला. आम्ही खूप कठीण संघ आहोत आणि सर्वकाही चांगले करत आहोत, असे पोरो म्हणाला. फ्रान्सच्या एम्बाप्पे, डीझायर, बार्कोला यांना मिळालेल्या संधीचा लाभ उचलता आला नाही. गोलरक्षक सिमॉन बॉक्सच्या बाहेर येऊनही बचाव करत होता.

या क्षणापर्यंत पोहोचणे खूप कठीण होते, पण आम्हाला आणखी हवे आहे आणि हा वर्ल्ड कप जिंकायचा आहे, असा विश्वास स्पेनचा मिडफिल्डर रॉड्री याने व्यक्त केला. सलग तीनवेळा अंतिम फेरी गाठणारा तिसरा संघ बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या फ्रान्सला आता शनिवारी फ्लोरिडामधील मियामी गार्डन्स येथे तिसऱ्या स्थानासाठी सामना खेळावा लागेल. स्पेनने चांगला बचाव केला, त्यांनी सर्व जागा बंद केल्या आणि आमच्याकडून तांत्रिक चुका झाल्या, असे फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर देशचॅम्प्स यांनी सांगितले.

एकूणच आता स्पेनला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. स्पेनने आपल्या टिकीटाका वृत्तीच्या बळावर पुन्हा एकदा विश्वाला त्यांच्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडले आहे.

यमालची एम्बाप्पेवर तिसऱ्यांदा सरशी

फुटबॉलच्या या सर्वात मोठ्या मंचावरील स्पेनचा हा विजय म्हणजे सलग तिसऱ्या उन्हाळ्यात स्पेनने फ्रान्सला स्पर्धेच्या उपांत्य फेरीत हरवण्याची घटना ठरली. यामलने २०२४ च्या युरो चषक उपांत्य फेरीत २-१ ने मिळालेल्या विजयात गोल केला होता, तर गेल्या वर्षी ‘नेशन्स लीग’मध्ये ला रोहाने ५-४ असा विजय मिळवला होता. बेल्जियमविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील विजयानंतर फ्रान्सने सावध राहावे, असा इशारा यामलने दिला होता. स्पेन असा संघ आहे ज्याला सामन्यावर आणि चेंडूवर नियंत्रण ठेवायला आवडते आणि आम्ही त्यांना तेच करू दिले, असे एकही गोल न करू शकलेला एम्बाप्पे म्हणाला. एकूणच एम्बाप्पेने संपूर्ण संघ फिका पडल्याचे मान्य केले.

स्पेन ३७ सामने अपराजित

स्पेनने केप वर्देविरुद्धच्या गोलशून्य बरोबरीनंतर प्रतिस्पर्ध्यांवर १२-१ अशी मात केली आहे. गोलकीपर उनाई सायमनने बेल्जियमविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत एकमेव गोल स्वीकारला, ज्यामुळे त्याचा वर्ल्ड कपमधील ६५० मिनिटे गोल न होऊ देण्याचा विक्रम मोडीत निघाला. या विजयामुळे स्पेनची मार्च २०२४ पासूनची नियमित वेळेतील अजिंक्य राहण्याची मालिका ३७ सामन्यांपर्यंत (२८ विजय आणि ९ ड्रॉ) पोहोचली आहे. याने २००७-०९ मधील देशाचा ३५ सामन्यांचा जुना विक्रम मोडला.

स्पेनने दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. यापूर्वी २०१०मध्ये त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश करून विजेतेपद पटकावले होते. आता स्पेन १६ वर्षांनी पुन्हा जगज्जेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असेल.

फ्रान्सला सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्याची संधी होती. यापूर्वी १९५८, १९८२, १९८६ या तीन वेळेस फ्रान्सला उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

रेफ्रींवर निशाणा; झिदानकडून टीका

टेक्सासमध्ये झालेल्या या पराभवाचे तीव्र पडसाद अटलांटिक महासागराच्या पलीकडे असलेल्या फ्रान्समध्ये उमटले. फ्रान्सचा माजी खेळाडू झिनेदीन झिदानने खेळाडूंच्या कामगिरीवर खडाडून टीका केली आहे. फ्रान्सला कोणी हरवू शकत नाही, असा गैरसमज होता. मात्र स्पेनने तो मोडीत काढल्याचेही तो म्हणाला. संघातील खेळाडूंनीही या अपयशावर सहमती दर्शवली. मात्र प्रशिक्षक दिदिएर देशचॅम्प यांनी रेफ्रींच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी उपांत्य फेरीसाठी निवडण्यात आलेले रेफ्री खरच त्या पात्रतेचे होते का, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे एक वेगळीच चर्चा सध्या रंगत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in