मुंबई : श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार वेगवेगळ्या २२ ठिकाणी सुरू असून खो-खो स्पर्धेत शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीने पुरुष आणि महिला गटाचे जेतेपद पटकावले.
पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीने समता क्रीडा भवनचा १०-७ असा एक डाव ३ गुणांनी पराभव केला. या सामन्यात शिर्सेकर्सच्या निखील सोडये (२.३० मि. संरक्षण व १ गुण), रामचंद्र झोरे (१.३०, नाबाद १.५० मि. संरक्षण व २ गुण) तर समताच्या प्रथमेश दुर्गावले (१ मि. संरक्षण व १ गुण), व ज्ञानेश्वर गोवरे (१.१० मि. संरक्षण व १ गुण) यांचा खेळ उत्कृष्ट झाला. तर महिलांच्या सामन्यात शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीने ओम युवा स्पोर्ट्स क्लबचा ९-३ असा ६ गुणांनी विजय मिळवला. शिर्सेकर्सच्या साक्षी वाफेलकर (नाबाद १.४० मि. संरक्षण व ५ गुण), सिद्धी हिंदळेकर (नाबाद ४ मि. संरक्षण व २ गुण) तर ओम युवाच्या किंजल रजपूत (१.५०, ३.५० मि. संरक्षण), आकांक्षा त्रिभुवन (१.१०, २.२० मि. संरक्षण व १ गुण) यांची कामगिरी दमदार होती.
मुंबई शहर गटातील पुरुष गटाच्या उपांत्य सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिरने अमरहिंद मंडळावर १४-७ असा विजय साजरा केला. या सामन्यात समर्थच्या वेदांत देसाई (३.३०, १.४० मि. संरक्षण व ४ गुण), प्रणय मयेकर (२ मि. संरक्षण व २ गुण) तर अमरहिंदच्या नितीन व प्रसादने चागली कामगिरी केली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने ओम साईश्वरवर सेवा मंडळावर ९-७ असा एक डाव विजय प्राप्त केला. विद्यार्थ्याकडून शुभम शिंदे (३ मि. संरक्षण), हर्ष कामठेकर २.३० मि. संरक्षण), पियुष काडगे (२ गुण) तर ओम साईश्वरच्या नितेश अष्टमकर (१.३० मि. संरक्षण व १ गुण), भूपेश गायकवाड आणि ओम वाटाणे (प्रत्येकी १-१ गुण) यांनी सामना गाजवला.
महिलांच्या सामन्यात शिवनेरी सेवा मंडळाने समर्थ व्यायाम मंदिराचा ५-२ असा एक डाव ३ गुणांनी पराभव केला. या सामन्यात शिवनेरीच्या मुस्कान शेख (५ मि. संरक्षण), ऐश्वर्या पिल्ले (४.४० मि. संरक्षण व १ गुण) यांनी तर समर्थच्या श्रिया नाईक (३.१० मि. संरक्षण) यांची कामगिरी वाखाणण्यासारखी झाली.