

नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी २०२५ या वर्षासाठीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. यंदा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ‘ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’साठी एकाचीही निवड न करण्याचा आश्चर्यकारक निर्णय मंत्रालयाने घेतला आहे.
त्याचवेळी निवड समितीच्या शिफारशींचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर १७ खेळाडूंना प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. २०१४ नंतर देशात एकाही खेळाडूला खेळरत्न न मिळण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. राज्यातील विश्वचषक विजेती दिव्या देशमुख आणि विदित गुजराती या बुद्धिबळपटूंचा अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे.
क्रीडा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा व अग्रगण्य पुरस्कार म्हणून खेलरत्नची ओळख आहे. त्यानंतर अर्जुन पुरस्काराचा क्रमांक लागतो. २०२५मध्ये जानेवारी महिन्यात २०२४ वर्षासाठी क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पार पडला होता. यंदा मात्र २०२५चे विजेते जाहीर करण्यासाठीच २०२६चा ऑगस्ट महिना उजाडल्याने पुरस्कार वितरण सोहळा कधी होईल, हे सांगता येणार नाही. २९ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. त्या दिवशी हे पुरस्कार दिले जाऊ शकतात. खेलरत्न पुरस्कारासाठी २५ लाख रुपये आणि पदक दिले जाते, तर अर्जुन पुरस्काराचे स्वरूप १५ लाख रुपये व मानपत्र असे आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने हॉकीपटू हार्दिक सिंग यांच्या नावाचा खेलरत्नसाठी विचार केला होता, परंतु अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. मंत्रालयाकडे निवड समितीने २४ नावांची शिफारस केली होती; मात्र क्रीडा पुरस्कारांचे पावित्र्य राखण्यासाठी आणि पात्र खेळाडूंचीच निवड व्हावी यासाठी मंत्रालयाने फेरपडताळणी करत १७ नावांना मंजुरी दिली.
अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये विश्वचषक विजेती १९ वर्षीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, आशियाई खेळात पदक विजेता तेजस्विन शंकर आणि बॅडमिंटनपटू गायत्री गोपीचंद यांचा समावेश आहे. याशिवाय बुद्धिबळपटू विदित गुजराती, बॅडमिंटनपटू ट्रीसा जॉली, बॉक्सर नरेंदर बरवाल आणि कर्णबधिर रायफल नेमबाज धनुष श्रीकांत यांचाही या यादीत समावेश आहे. २०२३मध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला पुरस्कार मिळाल्यानंतर यंदाही एकाही क्रिकेटपटूला या यादीत स्थान मिळालेले नाही.
पॅरा क्रीडा क्षेत्रातून यंदा क्लब थ्रोवर एकता भ्याण आणि नेमबाज रुद्रांश खंडेलवाल या दोघांचीच निवड झाली आहे. प्रशिक्षकांसाठीच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी बॉक्सिंग प्रशिक्षक छोटेलाल यादव, तर जीवनगौरव श्रेणीत धर्मेंद्र यादव आणि कुस्ती प्रशिक्षक वीरेंद्र कुमार यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
यंदा पुरस्काराच्या निवड समितीत भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) उपाध्यक्ष गगन नारंग, माजी बॅडमिंटनपटू अपर्णा पोपट आणि माजी हॉकीपटू एम. एम. सोमय्या यांचा समावेश होता.
पुरस्कार विजेत्यांची यादी
अर्जुन (१७) : तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल, प्रियंका गोस्वामी (ॲथलेटिक्स), ट्रीसा जॉली, गायत्री गोपिचंद (बॅडमिंटन), नरेंदर बेरवाल (बॉक्सिंग), विदित गुजराती, दिव्या देशमुख (बुद्धिबळ), धनुष श्रीकांत (कर्णबधिर नेमबाजी), लालरेमसियामी, राजकुमार पाल (हॉकी), सुरजीत, पूजा (कबड्डी), रुद्रांक्ष खांडेलवाल (पॅरा नेमबाजी), एकता भ्याण (पॅरा ॲथलेटिक्स), अरविंद सिंग (नौकानयन), अखिल शेरॉन (नेमबाजी).
अर्जुन जीवनगौरव पुरस्कार (१) : आय. अरुमैनायगम (फुटबॉल)
द्रोणाचार्य पुरस्कार (३) : परवीर सिंग (ॲथलेटिक्स), छोटेलाल यादव (बॉक्सिंग), नेहा चव्हाण (नेमबाजी)
द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार (२) : धर्मेंद्र सिंग यादव (बॉक्सिंग), विरेंदर कुमार (कुस्ती)
राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार : आमी पॅरालिम्पिक नोड, पुणे