मुंबई : राज्यात अल्पसंख्याक ८ हजारांहून अधिक शाळा असून शाळांमध्ये क्रीडा शिक्षक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या शाळांमध्ये क्रीडा शिक्षक नसल्याचे निदर्शनास आले तर त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे.
देशात ६५ टक्के तरुणवर्ग असून तरुणांना खेळात प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा स्तरावर क्रीडा संकुल उभारण्यात येणार असून क्रीडा संकुल शाळा व महाविद्यालये यांच्याशी जोडण्यात येणार आहेत, असेही कोकाटे यांनी सांगितले. मुंबईत खेळासाठी वफ बोर्डाच्या जागा उपलब्ध करण्यात येतील, असेही ते म्हणाले. तसेच कतार येथे खेळांची मैदाने मोठी असून कतार बरोबर करार करण्यात येणार असून भारतीय खेळाडू तिकडे प्रशिक्षणासाठी जातील आणि खेळाडूंचा उत्साह वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईत पवई, ठाणे येथे तलाव असून कतारच्या धर्तीवर पाण्यातील खेळाचे आयोजन करता येईल का याची चाचपणी करण्यात येईल, असे ते म्हणाले.
सर्वसमावेशक व सुधारित युवा धोरणाची गरज १३ ते ३५ वयोगटातील युवकांना जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले विचार, मते आणि सूचना देण्याचे आवाहन कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केले.
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या ‘सरदार@१५० युनिटी मार्च’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे, अशी माहितीही कोकाटे यांनी दिली.