इम्पॅक्ट प्लेयर नसूनही रोहित ठरणार यंदा प्रभावी; IPL च्या १९व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी प्रशिक्षक महेला जयवर्धने यांचे सूचक विधान

भारताचा तारांकित फलंदाज रोहित शर्मा आगामी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) फक्त इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळणार नाही, असे मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
इम्पॅक्ट प्लेयर नसूनही रोहित ठरणार यंदा प्रभावी; IPL च्या १९व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी प्रशिक्षक महेला जयवर्धने यांचे सूचक विधान
Published on

मुंबई : भारताचा तारांकित फलंदाज रोहित शर्मा आगामी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) फक्त इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळणार नाही, असे मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी मंगळवारी स्पष्ट केले. रोहितचा यंदाच्या हंगामात इम्पॅक्ट प्लेयरविनाही अधिक प्रभाव असेल, असे त्यांनी सांगत चाहत्यांना खुशखबर दिली.

काही दिवसांपूर्वीच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. क्रांती घडवण्यासह इतिहासाची पुनरावृत्ती करून यंदा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्याचबरोबर भारताने आयसीसी जेतेपदाची हॅटट्रिक साध्य केली. भारताने २०२४मध्ये टी-२० विश्वचषक, २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब पटकावला होता.

आता सर्वांना आयपीएलच्या १९व्या हंगामाचे वेध लागले आहेत. २८ मार्चपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होईल. विराट कोहलीचा समावेश असलेला आणि रजत पाटिदारच्या नेतृत्वात खेळणारा गतविजेता रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू संघ अपेक्षेप्रमाणे स्पर्धेचा सलामीचा सामना खेळणार आहे. बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत बंगळुरूसमोर सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असेल. पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघ रविवार, २९ मार्च रोजी आपल्या अभियानास प्रारंभ करेल. त्यांची वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्सशी गाठ पडेल.

पश्चिम बंगाल, तमिळनाडू व आसाम येथे निवडणुका होणार असल्याने बीसीसीआय पुढील वेळापत्रक काही कालावधीनंतर जाहीर करणार आहे. एकूण १६ दिवसांचे वेळापत्रक तूर्तास जाहीर करण्यात आले असून या दरम्यान २० सामने खेळवण्यात येतील. त्या निमित्ताने मंगळवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान जयवर्धने यांनी रोहितच्या या हंगामातील भूमिकेबाबत भाष्य केले. रोहित गेल्या २ वर्षांपासून प्रामुख्याने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आयपीएलमध्ये खेळत आहे. म्हणजेच तो फक्त फलंदाजीसाठी येत असून क्षेत्ररक्षणाच्या वेळेस विश्रांती करत आहे. २०२५मध्ये त्याला काहीशी दुखापत झाल्याने तो क्षेत्ररक्षण करणे टाळत असल्याचे समजले होते.

“रोहित यावेळी सराव शिबिरात लवकर दाखल झाल्याने युवा खेळाडूंचा नक्कीच लाभ झाला आहे. गेल्या हंगामात दुखापतीमुळे तो प्रामुख्याने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळताना आढळला. मात्र यंदा रोहित आपल्याला मैदानात अधिक काळ दिसेल. क्षेत्ररक्षण करताना त्याचा अनुभव संघासाठी फायदेशीर ठरेल,” असे जयवर्धने म्हणाले. त्याशिवाय, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमरा असे एकापेक्षा एक प्रतिभावान खेळाडू संघात असल्याने प्रशिक्षक म्हणून आपले कार्य सोपे होत असल्याचेही जयवर्धने यांनी सांगितले.

मुंबईला गेल्या हंगामात क्वालिफायर-२मध्ये पराभव पत्करावा लागला, तर २०२४मध्ये मुंबई तळाच्या स्थानी होती. या दोन्ही हंगामात मुंबईने रोहितचा योग्य वापर केला नाही, अशी टीका चाहत्यांनी केली होती. अखेरीस २०२६मध्ये रोहितचे मार्गदर्शन कर्णधार हार्दिकसाठी फलदायी ठरणार, असे दिसत आहे.

वानखेडेवरील लढतींची तिकीट विक्री उद्यापासून

मुंबई इंडियन्सच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएल लढतींच्या तिकीट विक्रीला गुरुवारपासून प्रारंभ होईल. १९ मार्च ते २१ मार्च या कालावधीत गुगल पे यूझर्सला प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर गोल्ड, सिल्व्हर आणि ज्युनियर मेंबरशीप कार्ड असलेल्या चाहत्यांना तिकीट खरेदी करता येईल. ही सर्व तिकिटे बुक माय शोद्वारे बुक करायची असून २३ तारखेला सर्वसामान्य चाहत्यांना तिकिटे विकत घेता येतील. मुंबईचा संघ रविवार, २९ मार्चला कोलकाताविरुद्ध वानखेडेवर खेळेल. त्यानंतर १२ एप्रिल रोजी मुंबई-बंगळुरू वानखेडेवर आमनेसामने येतील.

logo
marathi.freepressjournal.in