पॅरिस : टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीत भारताच्या श्रीजा अकुलाने उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र मनिका बत्राला उपउपांत्यपूर्व फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले.
२६ वर्षीय श्रीजाने वाढदिवशीच महिला एकेरीच्या राऊंड ऑफ ३२ सामन्यात सिंगापूरच्या जियान झेंगला ४-२ असे नमवले. सहा गेमपर्यंत रंगलेली ही लढत श्रीजाने ९-११, १२-१०, ११-४, ११-५, १०-१२, १२-१० अशी जिंकली. मनिकानंतर भारतासाठी उपउपांत्यपूर्व फेरी गाठणारी श्रीजा ही दुसरीच खेळाडू ठरली आहे. आता तिच्यासमोर राऊंड ऑफ १६ सामन्यात चीनच्या सून यिंगशाचे आव्हान असेल. मनिकाचा पराभव झाल्याने श्रीजाला इतिहास रचण्याची संधी आहे. तिच्यावरच भारताचे एकेरीतील आव्हान टिकून आहे. श्रीजाने बुधवारी ती भारतातील आघाडीची टेबल टेनिसपटू का आहे, हे दाखवून दिले.
मनिकाला राऊंड ऑफ १६ लढतीत जपानच्या मियू हिरानोने ४-१ असे नेस्तनाबूत केले. हिरानोने मनिकावर ११-६, ११-९, १२-१४, ११-८, ११-६ असे सहज वर्चस्व गाजवले. पुरुषांमध्ये अचंता शरथ कमल, हरमीत देसाई यांचेही आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता सांघिक प्रकारात भारताला दोन्ही संघांकडून पदक अपेक्षित असेल.