श्रीलंका-अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका: निसांका श्रीलंकेचा पहिला द्विशतकवीर

श्रीलंकेसाठी लिस्ट-ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा निसांका पाचवा फलंदाज ठरला.
श्रीलंका-अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका: निसांका श्रीलंकेचा पहिला द्विशतकवीर

पालेकेले : सलामीवीर पथुम निसांकाने शुक्रवारी धडाकेबाज द्विशतकी खेळी साकारली. निसांकाने २० चौकार व ८ षटकारांसह १३९ चेंडूंतच नाबाद २१० धावा फटकावल्या. श्रीलंकेसाठी एकदिवसीय प्रकारात द्विशतक झळकावणारा तो पहिला, तर विश्वातील एकंदर १०वा फलंदाज ठरला. त्यामुळे श्रीलंकेने अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५० षटकांत ३ बाद ३८१ धावांचा डोंगर उभारला.

पालेकेले स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात २५ वर्षीय निसांकाने एकदिवसीय कारकीर्दीतील बरोबर ५०व्या सामन्यात एकंदर चौथे शतक साकारले. तसेच सनथ जयसूर्याने २०००मध्ये भारताविरुद्ध १८९ धावा केल्या होत्या. निसांकाने त्याचा हा विक्रम मोडीत काढून श्रीलंकेसाठी एकदिवसीय प्रकारातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली.

श्रीलंकेसाठी लिस्ट-ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा निसांका पाचवा फलंदाज ठरला. यापूर्वी चार महिला क्रिकेटपटूंनी त्यांच्यासाठी द्विशतक साकारले होते. त्याने १३६ चेंडूंतच द्विशतकाची वेस ओलांडली. अविष्का फर्नांडो (८८) व सदीरा समरविक्रमा (४५) यांनीही फटकेबाजी केल्याने श्रीलंकेने साडे तीनशेहून अधिक धावसंख्या उभारली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा अफगाणिस्तानने प्रत्युत्तरात ३८ षटकांत ५ बाद २३१ धावा केल्या होत्या.

एकदिवसीय प्रकारातील हे १२वे द्विशतक ठरले. यापूर्वी भारताच्या रोहित शर्माने तीन वेळा, तर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, मार्टिन गप्टिल, फखर झमान, इशान किशन, शुभमन गिल यांनी प्रत्येकी एकदा द्विशतक झळकावले होते.

logo
marathi.freepressjournal.in