आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा भारतावर शानदार विजय

कर्णधार रोहित शर्माच्या (४१ चेंडूंत ७२ धावा) झंझावाती फलंदाजीच्या जोरावर भारताने निर्धारित षटकांत ८ बाद १७३ धावा केल्या
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा भारतावर शानदार विजय
Published on

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर-४ च्या सामन्यात श्रीलंकेने भारतावर सहा विकेट‌्सनी शानदार विजय मिळवत फायनलच्या दिशेने दमदार आगेकूच केली. विजयासाठीचे १७४ धावांचे लक्ष्य श्रीलंकेने १९.५ षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात साध्य केले. पथुम निसांका (३७ चेंडूत ५२) आणि कुसल मेंडिस (३७ चेंडूत ५७) यांनी ९७ धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला.

त्याआधी कर्णधार रोहित शर्माच्या (४१ चेंडूंत ७२ धावा) झंझावाती फलंदाजीच्या जोरावर भारताने निर्धारित षटकांत ८ बाद १७३ धावा केल्या. रोहितला सूर्यकुमार यादवने ३४ धावा करून शानदार साथ दिली; मात्र इतर फलंदाजांनी निराशा केल्याने भारताला मोठी आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात अपयश आले. श्रीलंकेकडून दिलशान मधुशंकाने तीन विकेट्स घेतल्या. चामिका करूणारत्ने आणि दासुन शनाका यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळविल्या. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सुरूवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकातील पाचव्या चेंडूवर महीश तीक्ष्णाने के एल राहुलला पायचीत केले. राहुलला सात चेंडूंत फक्त सहा धावांची भर घालता आली. त्यानंतर आशिया कप स्पर्धेत सलग दोन सामन्यात दोन अर्धशतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीचा डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंकाने तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्रिफळा उडविला. कोहलीला भोपळा फोडण्यात अपयश आले. त्यामुळे २ बाद १३ अशी भारताची अवस्था झाली. कर्णधार रोहित शर्माने मग आक्रमक अर्धशतक ठोकत भारताचा डाव सावरला. त्याने सूर्यकुमार यादवबरोबर शानदार भागीदारी रचत भारताला १० षटकात ७९ धावांपर्यंत नेले. रोहितच्या आक्रमक फलंदाजीमुळे बाराव्या षटकात भारताचे शतक धावफलकावर झळकले. मात्र तेराव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चामिका करूणारत्नेने रोहितला निसांकाच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. रोहितने पाच चौकार आणि चार षटकारांसह ४१ चेंडूंत ७२ धावा केल्या. त्याने सूर्यकुमारसमवेत तिसऱ्या विकेटसाठी ५८ चेंडूत ९७ धावांची भागीदारी रचली. त्याने कर्णधाराला साजेशी खेळी केली. रोहितचे या खेळीत अफलातून टायमिंग साधले. रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवला आपली एकाग्रता राखण्यात अपयश आले. दासुन शनाकाच्या गोलंदाजीवर त्याचा झेल उडाला. हा झेल थीकशानाने टिपला. सूर्यकुमारने २९ चेंडूंत ३४ धावा करताना एक षटकार आणि एक चौकार लगावला. हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांनी काही आक्रमक फटके लगावले. मात्र ते दोघेही प्रत्येकी १७ धावा करून बाद झाले. दीपक हुडानेही निराशा केली. तो शेवटची दोन षटके राहिलेली असताना तीन धावांवर मधुशंकाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. अश्विनने शेवटच्या दोन चेंडूवर आठ धावा करत भारताला २० षटकात ८ बाद १७३ धावांपर्यंत नेले. अर्शदीप सिंग एका धावेवर नाबाद राहिला.

भारताने आपल्या संघात एक बदल केला. रविचंद्रन अश्विन रवी बिश्नोईच्या जागी संघात आला. गेल्या सामन्यात खराब फटका मारून बाद होणारा ऋषभ पंत संघात कायम राहिला.

logo
marathi.freepressjournal.in