श्रीलंकेची आयर्लंडवर ९ विकेट्स राखून मात

श्रीलंकेचे सलामीवीर कुशल मेंडिस आणि धनंजय डिसिल्वा यांनी ६३ धावांची सलामी दिली.
श्रीलंकेची आयर्लंडवर ९ विकेट्स राखून मात

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीतील सामन्यात रविवारी श्रीलंकेने आयर्लंडवर ९ विकेट्स राखून मात केली. ४३ चेंडूंत नाबाद ६८ धावांची खेळी करणारा कुशल मेंडिसला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टी-२० विश्वचषक स्पर्धेचे २०१४ मध्ये विजेतेपद पटकाविणाऱ्या श्रीलंकेने आयर्लंडला निर्धारित २० षटकांत ८ बाद १२८ धावांवर रोखले आणि त्यानंतर १२९ धावांचे विजयाचे लक्ष्य १५ षटकांत एक विकेटच्या मोबदल्यात १३३ धावा करीत साध्य केले.

विजयासाठी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचे सलामीवीर कुशल मेंडिस आणि धनंजय डिसिल्वा यांनी ६३ धावांची सलामी दिली. २७ वर्षीय मेंडिसने डिसिल्वासमवेत दमदार भागीदारी केली. डिसिल्वा नवव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. गॅरेथ डेलानीने त्याला लॉरकन टकरच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर चारिथ असलंकाने २२ चेंडूंत नाबाद ३१ धावा करून कुशलला शानदार साथ दिली. मेंडिसने विजयी षटकार लगावला. मेंडिसने १५८. १३ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. मेंडिसने पाच चौकार आणि तीन षटकार लगावले.

त्याआधी, नाणेफेक जिंकून आयर्लंडने प्रथम फलंदाजी स्वीकारली. श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी अप्रतिम कामगिरी करताना आठपैकी पाच विकेट‌्स मिळविल्या. वेगवान गोलंदाजांना तीन विकेट्स मिळाल्या. विशिष्ट अंतराने फलंदाज बाद होत राहिल्याने आयर्लंडचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. करुणारत्नेच्या चेंडूवर कर्टिस कॅम्परचा (४ चेंडूंत २) असलंकाने शानदार झेल घेतला. जॉर्ज डॉकरेलला (१६ चेंडूंत १४) महेश तीक्ष्णाने त्रिफळाचीत केले. हॅरी टेक्टरचा (४२ चेंडूंत ४५) फर्नांडिसच्या चेंडूवर शनाकाने झेल टिपला.

आयर्लंडने दोन धावांवर ॲन्डी बालबर्पनेची (५ चेंडूंत १) पहिली विकेट गमावल्यानंतर पॉल स्टर्लिंगने (२५ चेंडूत ३४) एक बाजू सांभाळत उपयुक्त खेळी खेळली, पण त्याचा डाव त्याला मोठी खेळी करता आली नाही. डिसिल्वाच्या चेंडूवर तो राजपक्षेमार्फत झेलबाद झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in