गॉल : ऑफस्पिनर निशान पेरीसने (१७० धावांत ६ बळी) पदार्पणात पाच बळी मिळवण्याची किमया साधली. त्याला अन्य गोलंदाजांची प्रभावी साथ लाभल्याने श्रीलंकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा तब्बल १ डाव आणि १५४ धावांनी फडशा पाडला. याबरोबरच श्रीलंकेने मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले.
गॉल येथे झालेल्या या कसोटीत श्रीलंकेच्या पहिल्या डावातील ६०२ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ८८ धावांत गारद झाला. मग फॉलोऑन लादण्यात आल्यामुळे दुसऱ्या डावात त्यांना ५१४ धावा करायच्या होत्या. मात्र पेरीस व प्रभात जयसूर्या (३ बळी) यांच्यापुढे न्यूझीलंडचा दुसरा डाव चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात ८१.४ षटकांत ३६० धावांत संपुष्टात आला.
तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंड दुसऱ्या डावात ५ बाद १९९ अशा स्थितीत होता. तेथून पुढे खेळताना ग्लेन फिलिप्स (७८ धावा), टॉम ब्लंडेल (६०) व मिचेल सँटनर (६७) यांनी दमदार अर्धशतके झळकावली. मात्र तरीही त्यांना पिछाडी भरून काढता आली नाही. त्यामुळे किवी संघावर मालिका पराभवाची नामुष्की ओढवली. २७ वर्षीय पेरीसने पहिल्या डावात ३ बळी मिळवले होते, तर दुसऱ्या डावात त्याने ६ जणांना माघारी पाठवून श्रीलंकेचा विजय साकारला. मात्र १८२ धावांची दमदार खेळी साकारणारा कामिंदू मेंडिस सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तर मालिकेत सर्वाधिक १८ बळी घेणाऱ्या जयसूर्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.
श्रीलंकेने या वर्षात ६ कसोटी सामने जिंकले आहेत. २००१मध्ये त्यांनी वर्षभरात ८ कसोटी जिंकल्या होत्या. यावेळी हा विक्रम मोडला जाऊ शकतो.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका (पहिला डाव) : ५ बाद ६०२ घोषित
न्यूझीलंड (पहिला डाव) : सर्व बाद ८८
न्यूझीलंड (दुसरा डाव) : ८१.४ षटकांत सर्व बाद ३६० (ग्लेन फिलिप्स ७८, मिचेल सँटनर ६७; निशान पेरीस ६/१७०, प्रभात जयसूर्या ३/१३९)
सामनावीर : कामिंदू मेंडिस
मालिकावीर : प्रभात जयसूर्या