
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर २३ धावांनी वर्चस्व गाजवले. वानिंदू हसरंगाची (२१ चेंडूंत ३६ धावा आणि तीन बळी) अष्टपैलू चमक, प्रमोद मदुशनची (४/३४) भेदक गोलंदाजी आणि भानुका राजपक्षेच्या (४५ चेंडूंत नाबाद ७१ धावा) फटकेबाजीच्या जोरावर श्रीलंकेने ‘आशियाचा राजा’ ठरण्याचा बहुमान मिळवला. श्रीलंकेने दिलेल्या १७१ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव २० षटकांत १४७ धावांत संपुष्टात आला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने (४९ चेंडूंत ५५ धावा) दिलेली एकाकी झुंज व्यर्थ ठरली.
दुबईतील स्टेडियमवर झालेल्या या लढतीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने या लढतीसाठी हसन अली आणि अब्दुल कादिर यांना वगळून शादाब खान आणि नसीम शाह यांना पुन्हा संघात स्थान दिले. तर श्रीलंकेने मात्र संघात एकही बदल केला नाही.
नसीम शाहने पहिल्याच षट्कात कुशल मेंडिसचा शून्यावर त्रिफळा उडवला. त्यानंतर रॉफने पथुम निसांका (८) आणि दानुष्का गुणतिलका (१) यांचे बळी मिळवले. फिरकीपटू इफ्तिकार अहमदने धनंजया डीसिल्व्हा (२८), तर शादाब खानने दासुन शनकाला (२) माघारी पाठवून श्रीलंकेची पाच बाद ५८ अशी अवस्था केली.
त्यानंतर मात्र मैदानावर भानुकाचे वादळ घोंघावले. त्याने मिळालेल्या तीन जीवदानांचा पुरेपूर लाभ उचलताना सहा चौकार आणि तीन षट्कारांसह अर्धशतक झळकावले. वानिंदू हसरगांच्या (२१ चेंडूंत ३६) साथीने भानुकाने सहाव्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी रचली. तर चमिका करुणारत्नेच्या (नाबाद १४) साथीने त्याने सातव्या गड्यासाठी ५४ धावांची अभेद्य भर घातली. पाकिस्तानसाठी रौफने तीन, तर नसीम, शादाब आणि नवाझ यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
दरम्यान, दोन्हीही संघ आठ वर्षांनी आशिया चषकाच्या अंतिम फेरीत खेळत असून सुपर-फोरमध्ये श्रीलंकेने सलग तीन, तर पाकिस्तानने दोन सामने जिंकले होते. श्रीलंकेने अनुक्रमे अफगाणिस्तान, भारत आणि पाकिस्तानला धूळ चारली. तर पाकिस्तानने भारत, अफगाणिस्तान यांच्यावर मात केली. उभय संघांतील अंतिम फेरीचा आनंद लुटण्यासाठी जवळपास ४० हजारांहून अधिक प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते.