
कोलंबो : रोहित शर्माच्या फटकेबाजीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात शुक्रवारी भारताने शानदार सुरुवात केली. मात्र चारिथ असलंका आणि वानिंदू हसरंगा यांनी अप्रतिम गोलंदाजी करत भारताला बरोबरीत रोखले. चांगली सुरुवात करूनही भारताला विजयापासून दूर ठेवण्यात श्रीलंकेला यश आले.
प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या भारताने मनाजोगती सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांची पिसे काढली. त्याला शुभमन गिलने संयमी साथ दिली. या जोडगोळीने भारताच्या धावफलकावर बिनबाद अर्थशतक झळकावले. ही जोडी शतकी भागीदारीच्या दिशेने कूच करत असताना वेलालेजच्या सापळ्यात सलामीवीर गिल अडकला. १६ धावा करून गिल तंबूत परतला. त्यानंतर रोहित शर्माच्या विस्फोटक खेळीलाही ब्रेक लागला. येथेही वेलालेजच श्रीलंकेच्या मदतीला धावून आला. रोहितने ४७ चेंडूंत ५८ धावांची फटकेबाजी केली. ८० धावांवर भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला फार काळ मैदानात टिकता आले नाही. अवघ्या ५ धावांवर धनंजयाने सुंदरला पायचित केले. विराट कोहली (२४ धावा), श्रेयस अय्यर (२३ धावा), केएल राहुल (३१ धावा), अक्षर पटेल (३३ धावा), शिवम दुबे (२५ धावा) यांच्या सांघिक फलंदाजीच्या जोरावर भारत विजयासमीप आला होता. मात्र दुबे बाद झाल्यावर भारताच्या अडचणीत वाढ झाली. हसरंगा आणि असलंका यांनी शेवटच्या षटकांत शानदार गोलंदाजी करत भारताच्या विजयाच्या आशांना सुरुंग लावला. अखेर ४७.५ षटकांत २३० धावांवर भारताचा संघ सर्वबाद झाला आणि सामना बरोबरीत सुटला. हसरंगा आणि असलंका यांनी प्रत्येकी ३ विकेट्स मिळवत शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले.
नाणेफेकीचा कौल जिंकत श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच यजमानांच्या फलंदाजांना आपल्या ताब्यात ठेवले. मोहम्मद सिराजने अविष्का फर्नांडोला अर्शदीप सिंगकरवी झेलबाद करत श्रीलंकेची सलामीची जोडी फोडली. अवघी एक धाव करून फर्नांडो माघारी परतला. श्रीलंकेची मधली फळी उद्ध्वस्त करण्यात भारतीय गोलंदाजांना फारसे जड गेले नाही. शिवम दुबेने कुसल मेंडीसला १४ धावांवर पायचित करत परतीचा रस्ता दाखविल्यानंतर भारताच्या फिरकीपटूंनी धुमाकूळ घातला. अवघ्या ८ धावांवर सदिरा समरविक्रमाचा अडथळा दूर करत अक्षरने श्रीलंकेच्या चिंतेत भर घातली.