संघर्षपूर्ण विजयासह श्रीलंका सुपर-१२ फेरीत; मेंडिसचे अर्धशतक, हसरंगाची गोलंदाजीत चमक

विश्वचषकातील पात्रता फेरीच्या अ-गटातील सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १६२ अशी धावसंख्या उभारली
संघर्षपूर्ण विजयासह श्रीलंका सुपर-१२ फेरीत; मेंडिसचे अर्धशतक, हसरंगाची गोलंदाजीत चमक

सलामीवीर कुशल मेंडिसने ४४ चेंडूंत साकारलेली ७९ धावांची जिगरबाज खेळी आणि वानिंदू हसरंगाने २८ धावांत मिळवलेल्या तीन बळींच्या जोरावर श्रीलंकेने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नेदरलँड्सवर १६ धावांनी विजय मिळवला. यासह आशिया चषक विजेत्या श्रीलंकेने सुपर-१२ फेरीत प्रवेश केला. मात्र पराभवानंतरही नेदरलँड्सनेसुद्धा सुपर-१२ फेरीतील स्थान पक्के केले.

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या विश्वचषकातील पात्रता फेरीच्या अ-गटातील सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १६२ अशी धावसंख्या उभारली. पथुम निसांका (१४), धनंजय डीसिल्व्हा (०) यांना स्वस्तात गमावल्यानंतर मेंडिस आणि चरिथ असलंका (३१) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ६० धावांची भागीदारी रचून लंकेला सावरले. विशेषत: मेंडिसने पाच चौकार-षटकारांची आतषबाजी करून श्रीलंकेला १५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. लक्ष्याचा पाठलाग करताना मॅक्स ओडीडने ५३ चेंडूंत नाबाद ७१ धावांची झुंजार खेळी साकारली. त्यानंतरही नेदरलँड्सला २० षटकांत ९ बाद १४६ धावांपर्यंतच मजल मारता आली. हसरंगा आणि महीष थिक्षणा (२/३२) यांच्या फिरकी जोडीने पाच फलंदाजांना तंबूत धाडले. कुशल मेंडिस सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नामिबियाचा पराभव नेदरलँड्सच्या पथ्यावर

पात्रता फेरीतील अ-गटाच्याच नामिबिया विरुद्ध संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्यातील अखेरच्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात यूएईने नामिबियावर सात धावांनी मात केली. त्यामुळे तीन सामन्यांत एकच विजय मिळवणाऱ्या नामिबियाला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. तर नेदरलँड्सने गटातून दुसऱ्या स्थानासह आगेकूच केली. त्यांनी तीन लढतींपैकी दोन लढती जिंकल्या. मात्र धावगतीच्या तुलनेत ते श्रीलंकेच्या पिछाडीवर राहिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in