आशिया चषक स्पर्धेत श्रीलंका-पाकिस्तान आज आमनेसामने

श्रीलंकेच्या नागरिकांना त्यांच्या देशाच्या संघाकडून आनंदाचे काही क्षण निर्माण होण्याची मोठी अपेक्षा आहे
 आशिया चषक स्पर्धेत श्रीलंका-पाकिस्तान आज आमनेसामने

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात रविवारी श्रीलंका आणि पाकिस्तान हे एकमेकांपुढे उभे ठाकणार आहेत. सुपर-४ मध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारल्याने आणि पाकिस्तान चिवट लढवय्या म्हणून ओळखला जात असल्याने कोण होणार आशियाचा क्रिकेटमधील बादशहा, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

सामाजिक आणि आर्थिक संकटाला सामारे जाणाऱ्या श्रीलंकेच्या नागरिकांना त्यांच्या देशाच्या संघाकडून आनंदाचे काही क्षण निर्माण होण्याची मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या संघाला पाकिस्तानला नमविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.

श्रीलंका यंदाच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा यजमान असला, तरी आर्थिक संकाटामुळे देशात निर्माण झालेल्या सुरक्षाव्यवस्थेच्या चिंताजनक परिस्थितीमुळे या स्पर्धेचे आयोजन संयुक्त अरब अमिरातमध्ये करण्यात आले.

दासुन शनाका याच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघाला घरच्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत अंतिम सामना खेळता आला असता, तर त्यांना प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात पाठबळ आणि प्रोत्साहन मिळाले असते. दुबईतील प्रेक्षकांचा मात्र पाकिस्तानला पाठिंबा मिळणार आहे. तरीसुद्धा सुपर-४ मधील या संघाची कामगिरी बाबर आझमच्या पाकिस्तानी संघाच्या मनात धडकी भरविणारी आहे.

पाकिस्तानपुढील आव्हान वाटते तितके सोपे नाही. आशियाई क्रिकेट परिषद असो की, दुबईतील प्रेक्षक, सर्वांनाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम मुकाबला व्हावा, असे वाटत होते; परंतु श्रीलंकेने मुसंडी मारत अशी काही चमकदार कामगिरी केली की सर्वच जण थक्क झाले.

सुपर-४ मध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला पाच गडी राखून नमविल्यामुळे श्रीलंकेच्या संघाचा आत्मविश्वास निश्चितपणे वाढला आहे. बाबर आझम, मोहम्मद रिझवान, मोहम्मद नवाझ आणि नसीम शाह यांच्यासारख्या खेळाडूंना सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागेल. खेळाडूंची चुकीची निवड आणि मंडळातील अंतर्गत राजकारण यामुळेही श्रीलंकेचा संघ विस्कळीत वाटत होता; परंतु यातून हा संघ तावूनसुलाखून निघाला आहे. दुश्मंता चमीरासारख्या अनुभवी गोलंदाजाच्या अनुपस्थितीतही श्रीलंकेचे आक्रमण मजबूत वाटत आहे. फलंदाजीत कुसाल मेंडिस आणि पाथुम निसांका यांची सलामी निर्णायक ठरणार आहे. दनुष्का गुणतिलका, भानुका राजपक्षे, शनाका आणि चमकात्ने करुणारत्ने नेहमीप्रमाणेच उपयुक्त योगदान देऊ शकतात. गोलंदाजीत महेश तीक्ष्णा आणि वानिंदु हसरंगा यांच्याकडे फिरकी गोलंदाजीची धुरा राहील. दिलशान मधुशंकावर प्रामुख्याने जलद गोलंदाजीचा भार असेल. पाकिस्तानला कर्णधार बाबर आझमच्या फॉर्मची चिंता सतावत आहे. त्याने पाच सामन्यांत केवळ ६३ धावा केल्या आहेत. अंतिम सामन्यात सारी कसर भरून काढण्याचा त्याचा प्रयत्न राहील. गोलंदाजी हा पाकिस्तानचा मजबूत पक्ष आहे. युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत असून हारिस रॉफ आणि मोहम्मद हस्नैनसुद्धा उत्तम लयीत आहेत. त्याशिवाय शादाब खान आणि मोहम्मद नवाझ हे फिरकीपटू मधल्या षटकांत धावा रोखण्यासह बळी पटकावण्यात पटाईत आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in