ॲटकिन्सनपुढे श्रीलंकेची दुसऱ्या डावातही घसरगुंडी; ४८३ धावांचा पाठलाग करताना ९ बाद २८८ अशी अवस्था

वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सनने (६२ धावांत ५ बळी) केलेल्या दमदार माऱ्यापुढे श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली. त्यामुळे इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतसुद्धा विजयाच्या दिशेने कूच केली आहे.
ॲटकिन्सनपुढे श्रीलंकेची दुसऱ्या डावातही घसरगुंडी; ४८३ धावांचा पाठलाग करताना ९ बाद २८८ अशी अवस्था
Published on

लंडन : वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सनने (६२ धावांत ५ बळी) केलेल्या दमदार माऱ्यापुढे श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली. त्यामुळे इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतसुद्धा विजयाच्या दिशेने कूच केली आहे. ४८३ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची दुसऱ्या डावात अखेरचे वृत्त हाती आले, तेव्हा ८५ षटकांत ९ बाद २८८ अशी स्थिती होती.

श्रीलंका विजयापासून अद्याप १९५ धावा दूर होती, मात्र लाहिरू कुमारा व असिथा फर्नांडो यांच्या रूपात अखेरची जोडी मैदानावर होती. त्यामुळे श्रीलंकेला सामना वाचवण्यासाठी अविश्वसनीय कामगिरी करावी लागू शकते. उभय संघांतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने विजय मिळवला होता.

दरम्यान, इंग्लंडचा दुसरा डाव ५४.३ षटकांत २५१ धावांवर आटोपला. जो रूटने सलग दुसऱ्या डावात शतक साकारताना १२१ चेंडूंत १० चौकारांसह १०३ धावा केल्या. हॅरी ब्रूक (३७) व जेमी स्मिथ (२६) यांनीही योगदान दिले. त्यानंतर श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात दिमुथ करुणारत्ने (५५), दिनेश चंडिमल (५८), कर्णधार धनंजय डीसिल्व्हा (५०) यांनी अर्धशतके झळकावूनही संघाला संघर्ष करावा लागला. ॲटकिन्सनने पाच बळी मिळवले. त्याला ओली स्टोनने दोन बळी मिळवून चांगली साथ दिली.

रूटकडून कूकचा विक्रम मोडीत

रूटने कसोटी कारकीर्दीतील ३४वे शतक साकारताना ॲलिस्टर कूकचा ३३ शतकांचा विक्रम मोडीत काढला. इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणाऱ्यांच्या यादीत कूक यापूर्वी अग्रस्थानी होता. भारताच्या सचिन तेंडुलकरने कसोटीत सर्वाधिक ५१ शतके झळकावली आहेत. सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये मात्र रूट ३४ शतकांसह अग्रस्थानी आहे.

logo
marathi.freepressjournal.in