श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियाला प्रथमच व्हाइटवॉश; मेंडिसच्या शतकामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १७४ धावांनी वर्चस्व; असलंका मालिकावीर

कुशल मेंडिसने (११५ चेंडूंत १०१ धावा) साकारलेल्या शतकाच्या बळावर श्रीलंकेने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १७४ धावांनी धूळ चारली.
श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियाला प्रथमच व्हाइटवॉश; मेंडिसच्या शतकामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १७४ धावांनी वर्चस्व; असलंका मालिकावीर
@Gurjind56659796
Published on

कोलंबो : कुशल मेंडिसने (११५ चेंडूंत १०१ धावा) साकारलेल्या शतकाच्या बळावर श्रीलंकेने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १७४ धावांनी धूळ चारली. याबरोबरच श्रीलंकेने मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले. श्रीलंकेचा हा ऑस्ट्रेलियावर आजवरचा सर्वात मोठा विजय ठरला. तसेच त्यांनी इतिहासात प्रथमच ऑस्ट्रेलियावर एकदिवसीय मालिकेत व्हाइटवॉश लादला. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या तयारीला धक्का बसला आहे.

श्रीलंकेचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरलेला नाही. मात्र त्यांनी घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाला हैराण केले. ऑस्ट्रेलियाचेसुद्धा प्रमुख वेगवान गोलंदाज या मालिकेचा भाग नव्हते. पहिल्या लढतीत श्रीलंकेने २१४ धावा केल्यावर ऑस्ट्रेलियाला १६५ धावांत गुंडाळले होते. शनिवारीसुद्धा तसेच काहीसे चित्र पाहायला मिळाले.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ५० षटकांत ४ बाद २८१ धावांपर्यंत मजल मारली. मेंडिसने पाचवे शतक साकारताना ११ चौकार लगावले. त्याला निशान मदुष्का (५१) व कर्णधार चरिथ असलंका (नाबाद ७८) यांनी अर्धशतके झळकावून उत्तम साथ दिली. जनिथ लियांगेने नाबाद ३२ धावा फटकावल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ मात्र २४.२ षटकांत १०७ धावांतच गारद झाला. डावखुरा फिरकीपटू दुनिथ वेल्लालागेने ४, तर लेगस्पिनर वानिंदू हसरंगाने ३ बळी मिळवून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फिरकीच्या तालावर नाचवले. कर्णधार स्टीव्ह स्मिथ (२९), जोश इंग्लिस (२२) यांना वगळता कोणीही फारसा प्रतिकार करू शकले नाहीत. त्यामुळे श्रीलंकेने दमदार विजय नोंदवला. मेंडिस सामनावीर, तर २ सामन्यांत सर्वाधिक २०५ धावा करणारा असलंका मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

पाकिस्तानला नमवून न्यूझीलंडला जेतेपद

कराची : न्यूझीलंडने शुक्रवारी पाकिस्तानला तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात ५ गडी आणि २८ चेंडू राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ ४९.३ षटकांत २४२ धावांत गारद झाला. कर्णधार मोहम्मद रिझवान (४६), सलमान अघा (४५), तय्यब ताहिर (३८) यांनी कडवी झुंज दिली. न्यूझीलंडसाठी विल ओरूर्कने ४ बळी मिळवले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने ४५.२ षटकांत विजय मिळवला. डॅरेल मिचेल (५७), टॉम लॅथम (५६) यांनी अर्धशतके झळकावली. डेवॉन कॉन्वे (४८), केन विल्यम्सन (३४) यांनीही योगदान दिले. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी न्यूझीलंडने आपण लयीत असल्याचे दाखवून दिले. दक्षिण आफ्रिका संघ या मालिकेतून आधीच बाहेर पडला होता.

logo
marathi.freepressjournal.in