टी-२० सामन्यात श्रीलंकेच्या महिलांचा विजय,भारताचा सात विकेट्स राखून पराभव

श्रीलंकेच्या डावाची सुरुवात भारताप्रमाणेच निराशाजनक झाली होती
 टी-२० सामन्यात श्रीलंकेच्या महिलांचा विजय,भारताचा सात विकेट्स राखून पराभव

तिसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेच्या महिलांनी भारताचा सात विकेट्स राखून पराभव करून व्हाईटवॉश टाळण्यात यश मिळविले; मात्र भारताने मालिका २-१ ने जिंकली. विजयासाठीचे १३९ धावांचे लक्ष्य भारताने १७ षट्कात तीन बाद १४१ धावा करीत साध्य केले. श्रीलंकेकडून कर्णधार चामरी अथापथ्थूने ४८ चेंडूंत नाबाद ८० धावा केल्या. तिला प्लेअर ऑफ दि मॅच म्हणून गौरविण्यात आले, तर हरमनप्रीत कौरला प्लेअर ऑफ दि सीरिज म्हणून सन्मानित करण्यात आले.

श्रीलंकेच्या डावाची सुरुवात भारताप्रमाणेच निराशाजनक झाली होती. रेणुका सिंहने विशमी गुणरत्नेला पहिल्याच षट्कात पाच धावांवर बाद केले. पाचव्या षट्कात संघाच्या ३७ धावा झालेल्या असताना हर्षिता मडवीला राधा यादवने १३ धावांवर बाद केले. त्यानंतर सलामीवीर चामरी अथापथ्थू आणि नीलाक्षी डीसिल्वा यांनी श्रीलंकेला शतकी मजल मारून दिली. दरम्यान, अथापथ्थूने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले; मात्र संघाची धावसंख्या ११४ धावांपर्यंत पोहोचलेली असताना नीलाक्षी ३० धावांवर धावबाद झाली. यानंतर अथापथ्थूने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत नाबाद ८० धावांची खेळी करत श्रीलंकेला १७ व्या षट्कातच विजय मिळवून दिला.

त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित षट्कात ५ बाद १३८ धावा केल्या. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने ३३ चेंडूंत सर्वाधिक नाबाद ३९ धावा केल्या. भारताच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच षट्कात शफाली वर्मा पाच धावांवर बाद झाली. सलामीवीर स्मृती मानधना आणि साभिनेनी मेघना यांनी प्रत्येकी २२ धावांची खेळी करत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला; मात्र रणशिंगे आणि रणवीरा यांनी या दोघींना बाद केले. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्जने डाव सावरत संघाला शतकी मजल मारून दिली; मात्र रॉड्रिग्ज ३३ धावांवर १९व्या षट्कात बाद झाली. हरमनप्रीतने संघाला १३८ धावांपर्यंत पोहोचविले. तिला पूजा वस्त्राकरने सहा चेंडूत १३ धावांची खेळी करून साथ दिली. तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिले दोन सामने यापूर्वीच भारताने जिंकले असल्याने भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली. आता १ जुलैपासून तीन वन-डे सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला सामना १ जुलै, दुसरा सामना ४ जुलै आणि तिसरा सामना ७ जुलै रोजी होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in