गोलंदाजांमुळे श्रीलंकेचे कसोटी मालिकेत निर्भेळ यश! दुसऱ्या सामन्यात बांगलादेशवर १९२ धावांनी वर्चस्व

श्रीलंकेने दिलेल्या ५११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव पाचव्या दिवशी ८५ षटकांत ३१८ धावांत संपुष्टात आला. मेहदी हसनने १४ चौकारांसह ८१ धावांची झुंजार खेळी साकारली. तसेच मोमिनूल हकने ५० धावा केल्या. मात्र ५११ धावांचे लक्ष्य गाठणे जवळपास अशक्यच होते.
गोलंदाजांमुळे श्रीलंकेचे कसोटी मालिकेत निर्भेळ यश! दुसऱ्या सामन्यात बांगलादेशवर १९२ धावांनी वर्चस्व
Published on

चट्टोग्राम : फलंदाजीत छाप पाडल्यानंतर फिरकीपटू कामिंदू मेंडिसने (३२ धावांत ३ बळी) गोलंदाजीतही कमाल केली. त्याला वेगवान गोलंदाज लाहिरू कुमाराच्या (५० धावांत ४ बळी) प्रभावी माऱ्याची साथ लाभली. त्यामुळे श्रीलंकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा १९२ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह श्रीलंकेने मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले.

श्रीलंकेने दिलेल्या ५११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव पाचव्या दिवशी ८५ षटकांत ३१८ धावांत संपुष्टात आला. मेहदी हसनने १४ चौकारांसह ८१ धावांची झुंजार खेळी साकारली. तसेच मोमिनूल हकने ५० धावा केल्या. मात्र ५११ धावांचे लक्ष्य गाठणे जवळपास अशक्यच होते.

पहिल्या डावात श्रीलंकेने कामिंदू (९२) आणि कुशल मेंडिस (९३) यांच्या अर्धशतकांमुळे ५३१ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर असिता फर्नांडोने बांगलादेशचा पहिला डाव १७८ धावांतच गुंडाळून श्रीलंकेला तब्बल ३५३ धावांची आघाडी मिळवून दिली. श्रीलंकेने दुसरा डाव ७ बाद १५७ धावांवर घोषित केला. मग गोलंदाजांनी बांगलादेशला विजयापासून रोखले. सामनावीर कामिंदूने मालिकेत २ शतकांसह सर्वाधिक ३६७ धावा केल्याने तोच मालिकावीर पुरस्काराचा मानकरीसुद्धा ठरला.

यासह श्रीलंकेचा बांगलादेश दौरा समाप्त झाला. टी-२० मालिकेत श्रीलंकेने २-१ असे, तर एकदिवसीयमध्ये बांगलादेशने २-१ असे यश मिळवले. मग कसोटी मालिकेत श्रीलंकेने यजमानांना व्हाइटवॉश दिला.

logo
marathi.freepressjournal.in