
डर्बन : डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को यान्सेनपुढे (१३ धावांत ७ बळी) श्रीलंकेची पुरती तारांबळ उडाली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या ४२ धावांत गुंडाळला.
डर्बन येथील किंग्समेड स्टेडियमवर बुधवारपासून उभय संघांतील २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू झाली. पहिल्या दिवशी आफ्रिकेने ४ बाद ८० धावा केल्या होत्या. तेथून पुढे गुरुवारी त्यांचा पहिला डाव ४९.४ षटकांत १९१ धावांत आटोपला. कर्णधार टेम्बा बव्हुमाने ११७ चेंडूंत झुंजार ७० धावा केल्या. लाहिरू कुमारा व असिता फर्नांडो यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले. त्यामुळे श्रीलंकेला आघाडी घेण्याची उत्तम संधी होती.
मात्र यान्सेनपुढे त्यांची दैना उडाली. श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या १३.५ षटकांत ४२ धावांत आटोपला. श्रीलंकेने फक्त ८३ चेंडू खेळले. यापूर्वी १९२४मध्ये आफ्रिकेचा संघ इंग्लंडविरुद्ध १२.३ षटकांत म्हणजेच ७५ चेंडूंत गारद झाला होता. यान्सेनने कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना पथुम निसांका (३), दिनेश चंदिमल (०), अँजेलो मॅथ्यूज (१), कर्णधार धनंजय डीसिल्व्हा (७), प्रभात जयसूर्या (०), विश्व फर्नांडो (०) व असिता (०) यांचे बळी मिळवले. कामिंदू मेंडिसने श्रीलंकेसाठी सर्वाधिक १३ धावा केल्या. मात्र तरीही श्रीलंकेने वैयक्तिक कसोटीतील निचांकी धावसंख्या नोंदवली. यापूर्वी १९९४मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्यांचा डाव ७१ धावांत आटोपला होता. जेराल्ड कोएट्झेने दोन, तर कगिसो रबाडाने एक बळी मिळवला. आफ्रिकेला पहिल्या डावात १४९ धावांची आघाडी मिळाली.
त्यानंतर दुसऱ्या डावात आफ्रिकेने दुसऱ्या दिवसअखेर ४० षटकांत ३ बाद १३२ धावांपर्यंत मजल मारली आहे. एडीन मार्करम (४७) बाद झाल्यावर ट्रिस्टन स्टब्स (नाबाद १७) व बव्हुमा (नाबाद २४) यांनी मोर्चा सांभाळला आहे. त्यामुळे आफ्रिकेकडे दुसऱ्या डावात एकूण २८१ धावांची आघाडी आहे. दोन्ही संघांच्या दृष्टीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी ही मालिका निर्णायक आहे.