राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे तारे चमकले! मुंबईकर चिरागला खेलरत्न

मुंबईकर चिराग आणि आंध्रप्रदेशच्या सात्त्विकने २०२३ या वर्षात आशियाई सुवर्ण जिंकण्यासह एकंदर चार स्पर्धांचे विजेतेपद मिळवले.
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे तारे चमकले! मुंबईकर चिरागला खेलरत्न
PM

नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने बुधवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२३मधील विजेत्यांची यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्राचे तारे चमकल्याचे दिसून आले. मुंबईकर चिराग शेट्टीची त्याचा बॅडमिंटनमधील साथीदार सात्त्विकसाईराज रंकीरेड्डीसह प्रतिष्ठेच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न क्रीडा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये साताऱ्याची तिरंदाज अदिती स्वामी व नागपूरचा ओजस देवतळे यांचा समावेश आहे. त्याशिवाय महाराष्ट्राचेच मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरुखकर यांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

क्रीडा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा व अग्रगण्य पुरस्कार म्हणून ‘खेलरत्न’ची ओळख आहे. त्यानंतर अर्जुन पुरस्काराचा क्रमांक लागतो. ९ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे सर्व विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. वर्षभरात क्रीडा क्षेत्रात छाप पाडून भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्यांची तसेच प्रदीर्घ कारकीर्दीतील यशाच्या आधारे या पुरस्कारासाठी अनेकांची निवड केली जाते.

मुंबईकर चिराग आणि आंध्रप्रदेशच्या सात्त्विकने २०२३ या वर्षात आशियाई सुवर्ण जिंकण्यासह एकंदर चार स्पर्धांचे विजेतेपद मिळवले. तसेच त्यांनी गतवर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, तर जागतिक स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. ऑक्टोबरमध्ये त्यांनी जागतिक क्रमवारीत अग्रस्थान काबिज करून इतिहास रचला होता. जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळवणारी ती भारताची आजवरची पहिलीच दुहेरी जोडी ठरली होती.

दुसरीकडे अदितीने जागतिक, आशियाई स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक पटकावण्याची किमया साधली. तसेच ओजसनेही या दोन्ही स्पर्धांमध्ये एकेरी तसेच सांघिक विभागात सुवर्णपदकाला गवसणी घातली. १३ डिसेंबर रोजी नेमलेल्या समितीने या सर्व खेळाडूंना पुरस्कारासाठी नामांकन दिले होते. बुधवारी क्रीडा मंत्रालयाने त्याबाबत अधिकृत घोषणा केली. यंदा २६ जणांना अर्जुन, ५ जणांना द्रोणाचार्य, तर ३ जणांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येईल. यंदा मोहम्मद शमी हा अर्जुन पुरस्कार मिळवणारा एकमेव क्रिकेटपटू आहे.

 पुरस्कार विजेत्यांची यादी

* खेलरत्न पुरस्कार : चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी (बॅडमिंटन)

* अर्जुन पुरस्कार : मोहम्मद शमी (क्रिकेट), ओजस देवतळे, अदिती स्वामी (तिरंदाजी), मुरली श्रीशंकर, पारुल चौधरी (अॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग, आर. वैशाली (बुद्धिबळ), अनुश अगरवाला, दिव्यक्रिती सिंग (अश्वरोहण), दीक्षा डागर (गोल्फ), क्रिशन बहादूर पाठक, सुशीला चानू (हॉकी), पवन कुमार, रितू नेगी (कबड्डी), नसरीन (खो-खो), पिंकी (लॉन बॉल्स), ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, इशा सिंग (नेमबाजी), हरिंदरपाल सिंग संधू (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार, अंतिम पंघाल (कुस्ती), रोशिबीना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), अजय कुमार रेड्डी (अंधांचे क्रिकेट), प्राची यादव (पॅरा कॅनोइंग).

* द्रोणाचार्य पुरस्कार (वार्षिक) : ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), महावीर प्रसाद सैनी (पॅरा अॅथलेटिक्स), शिवेंद्र सिंग (हॉकी), गणेश देवरुखकर (मल्लखांब)

* द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव) : जसकिरत सिंग ग्रेवाल (गोल्फ), ई. भास्करन (कबड्डी), जयंत कुमार पुशिलाल (टेबल टेनिस)

* ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार : मंजुषा कन्वर (बॅडमिंटन), विनीत कुमार शर्मा (हॉकी), कविता सेल्वाराज (कबड्डी)

logo
marathi.freepressjournal.in