राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेला १३ ऑगस्टपासून प्रारंभ

बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिज ठाकूर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेला १३ ऑगस्टपासून प्रारंभ

पालघर डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने भास्कर वामन ठाकूर यांच्या स्मरणार्थ ५६व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०२२-२०२३ विरार पश्चिम येथील जुन्या विवा कॉलेज येथे आयोजिण्यात येत आहे. स्पर्धेचे उद‌्घाटन १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर व आमदार क्षितिज ठाकूर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष वयस्कर एकेरी (५० वर्षांवरील), महिला वयस्कर एकेरी (५० वर्षांवरील) तसेच पुरुष व महिला आंतरजिल्हा सांघिक गट अशा एकंदर सहा गटांमध्ये दररोज सकाळी १० ते रात्री १०पर्यंत सामने खेळविले जातील. यजमान पालघरव्यतिरिक्त मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, रायगड, धुळे, सातारा व नांदेड अशा महाराष्ट्राच्या एकंदर १४ जिल्ह्यातून ५१६ खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला आहे.

यामध्ये पुरुष गटात आजी-माजी विश्वविजेते प्रशांत मोरे व योगेश परदेशीसहीत आंतर राष्ट्रीय खेळाडू महम्मद घुफ्रान, रियाझ अकबर अली, संदीप देवरुखकर, प्रकाश गायकवाड, नागसेन एटंबे, हिदायत अन्सारी, जितेंद्र काळे, संजय मांडे खेळणार असून महिलांमध्ये काजल कुमारी, अनुपमा केदार, आयेशा साजिद खान, आकांक्षा कदम, नीलम घोडके आदी खेळाडूंनी भाग घेतला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in